वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आंद्र रसेल (Andre Russell) याला पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) पहिल्याच सामन्यात दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे. क्वेटा ग्लेडिएटर्सकडून (Quetta Gladiators) खेळताना रसेल याला इस्लामाबाद युनायडेटचा गोलंदाज मोहम्मद मूसा यानं टाकलेला चेंडू हेल्मेटवर आदळल्यानं दुखापत झाली. क्षेत्ररक्षणावेळी देखील तो मैदानात दिसला नाही. त्याच्या जागी संघात नसीम शाह याला खेळविण्यात आलं.
आंद्रे रसेल याला फलंदाजीवेळी सामन्याच्या १४ व्या षटकात दुखापत झाली. विशेष म्हणजे मोहम्मद मूसाच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार रसेलनं ठोकले. पण त्यानंतरचा स्लोअर वन चेंडू लक्षात न आल्यानं तो रसेलच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर फिजिओनं मैदानात येऊन रसेलला तपासलं. दुखापतीनंतरही रसेल यानं फलंदाजी करणं सुरू ठेवलं. पण पुढच्याच चेंडूवर वर तो थर्ड मॅनवर झेल देऊन बसला आणि माघारी परतला. ६ चेंडूत १३ धावा करुन रसेल बाद झाला. पण इस्लमाबाद संघाचा डाव सुरू झाल्यावर रसेल क्षेत्ररक्षणासाठी मैदानात दिसला नाही. रसेल याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रसेलच्या जागी नसीम शाहला खेळविण्यात आलं.