T10 League Final : डेक्कन ग्लॅडिएटर्स ( Deccan Gladiators) संघानं टी १० लीग २०२१-२२चे जेतेपद नावावर केलं. अंतिम सामन्यात त्यांनी दिल्ली बुल्स संघावर ५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. डेक्कन ग्लॅडिएटर्सचे हे पहिलेच जेतेपद आहे. याआधी त्यांना २०१९मध्ये अंतिम लढतीत मराठा अरेबियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. केरळ किंग्स ( २०१७), नॉर्दर्न वॉरियर्स ( २०१८ व २०२१) यांनी जेतेपद पटकावले होते. काल झालेल्या अंतिम सामन्यात आंद्रे रसेलची ( Andre Russell) बॅट चांगलीच तळपली. त्यानं ३२ चेंडूंत ९० धावांची स्फोटक खेळी करताना संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला.
प्रथम फलंदाजी करताना ग्लॅडिएटर्सनं १० षटकांत १५९ धावा कुटल्या. रसेलनं ३२ चेंडूंत ९० धावा करताना ९ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी केली. टॉम लोह्लेर-कॅडमोरनंही त्याला साथ देताना २८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. या दोघांनी १५९ धावांची विक्रमी भागीदारी केली. प्रत्युत्तरात दिल्ली बुल्सला ७ बाद १०३ धावा करता आल्या. चंद्रपॉल हेमराजनं २० चेंडूंत ४२ धावांची खेळी करून एकट्यानं संघर्ष केला. ओडीन स्मिथ ( २-२०), वनिंदू हसरंगा ( २-२०) व टायमल मिल्स ( २-४) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत विजयात हातभार लावला. ग्लॅडिएटर्सनं हा सामना ५६ धावांनी जिंकला. रसेलनंही एक विकेट घेतली.
इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) रसेलला रिटेन केलं आहे. KKRनं रसेलला १२ कोटी रकमेत संघात कायम राखले. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी), वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) , सुनील नरीन ( 6 कोटी) यांनाही IPL 2022साठी संघात कायम ठेवले आहे. रसेलनं ट्वेंटी-२०त ३८७ सामन्यांत २ शतकं व २५ अर्धशतकांसह ६४३० धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर ३४३ विकेट्स आहेत. नाबाद १२१ व ५ बाद १५ ही त्याची अनुक्रमे फलंदाजीत व गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी आहे.