वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल ( Andre Russell) हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाज आहे, यात कोणताच वाद नाही. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) त्याच्या फटकेबाजीनं कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) अनेक विजय मिळवून दिले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ५७९३ धावा, ३९६ चौकार व ४५५ षटकार खेचणाऱ्या रसेलचं वादळ काल श्रीलंकेत घोंगावलं. कोलंबो किंग्स ( Colombo Kings) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रसेलनं लंका प्रीमिअर लीगमध्ये ( Lanka Premier League) गॅल ग्लॅडिएटर्स संघाच्या गोलंदाजांना धु धु धुतले.
पावसाच्या व्यत्ययामुळे शनिवारी खेळवण्यात आलेला सामना ५-५ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना किंग्सकडून रसेल आणि थिक्षिला डी सिल्वा हे सलामीला आले. पण, दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिल्वा ( ०) बाद झाला. त्यानंतर रसेलनं सामन्याची सूत्र हाती घेत तुफान फटकेबाजी केली. त्यानं १९ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६५ धावा चोपल्या. लॉरी इव्हान्सनेही १० चेंडूंत नाबाद २१ ( १ चौकार व २ षटकार) धावा केल्या. या दोघांनी किंग्सला पाच षटकांत १ बाद ९६ धावांचा डोंगर उभा करून दिला. पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरच्या दोन षटकांत तब्बल ४६ धावा रसेलनं चोपल्या.
प्रत्युत्तरात शाहिद आफ्रिदीच्या ग्लॅडिएटर संघाला २ बाद ६२ धावा करता आल्या. दानुष्का गुणथिलका ( ३०*) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. आफ्रिदी १२ धावाच करू शकला.
Web Title: Andre Russell wearing KKR gloves in Lanka Premier League, smashed 65* off 19 balls against Galle Gladiators
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.