नवी दिल्ली : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात 67 धावांनी विजय मिळवताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाज उमरान मलिक, मोहम्मद सिराज यांनी आपली कामगिरी चोख बजावली. विराट कोहलीने पहिल्या सामन्यातून वन डे क्रिकेटमधील 45 वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने 87 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकारांसह 113 धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले.
प्रत्युत्तरात 374 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला पूर्णपणे अपयश आले. श्रीलंकेचा संघ 50 षटकांत 8 बाद केवळ 306 धावा करू शकला. मात्र, पाहुण्या संघाचा कर्णधार दासुन शनाकाने एकतर्फी झुंज दिली आणि किल्ला लढवला. त्याला संघाचा पराभव टाळण्यात अपयश आले मात्र शतकी खेळी करून शनाकाने सर्वांची मनं जिंकली.
दासुन शनाकाने झळकावले शतक दरम्यान, कर्णधार दासून शनाकाने संघर्ष दाखवताना शतक पूर्ण केले. परंतु श्रीलंकेला हार मानावी लागली. त्यांनी 8 बाद 306 धावांपर्यंत मजल मारली. शनाकाने 88 चेंडूंत 12 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 108 धावा केल्या. 50व्या षटकात शनाकाला शतक पूर्ण करण्यासाठी 5 धावा हव्या होत्या. मोहम्मद शमीच्या पहिल्या चेंडूवर शनाकाने दोन धावा घेतल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतल्याने कसून रजिथा स्ट्राईकवर आला. शमी चौथा चेंडू टाकणार तोपर्यंत शनाका नॉन स्ट्राईक एंडवर क्रिज सोडून पुढे गेला होता. शमीने त्याला रन आऊट केले अन् अपील केले.
रोहितनं जिंकली मनं अम्पायर नितिन मेनन यांनी तिसऱ्या अम्पायरचा सिग्नल दिला, परंतु रोहित पळत आला अन् अपील मागे घेतले. त्यानंतर रजिथाने एक धाव घेत शनाकाला स्ट्राईक दिली अन् श्रीलंकेच्या कर्णधाराने शतक पूर्ण केले. रोहितच्या या कृतीने मात्र चाहत्यांचे मन जिंकले. ''शनाका 98 धावांवर होता आणि अशा प्रकारे त्याने बाद होऊ नये अशी आमची इच्छा होती. त्यामुळे अपील मागे घेतली,'' असे रोहित म्हणाला.
दिग्गजांकडून रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव रोहित शर्माच्या या निर्णयाचे श्रीलंकेच्या दिग्गजांनी कौतुक केले आहे. अँजेलो मॅथ्यूजने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "बरेच कर्णधार असे करतील पण रोहित शर्माने मनं जिंकली. अपील मागे घेतल्याबद्दल @ImRo45 ला सलाम! चांगल्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन." तर सनथ जयसूर्या यांनी देखील हिटमॅनच्या निर्णयाला दाद दिली. "रोहित शर्माने धावबाद करण्यास दिलेला नकार आणि दाखवलेली खिलाडीवृत्ती त्यामुळे तो खरा विजेता होता", असे जयसूर्या यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"