रोमहर्षक सामन्यांसोबतच भारताने आयोजित केल्या जाणाऱ्या २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अनेक वाद समोर आले आहेत. आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. मात्र या सामन्यात श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज विचित्र पद्धतीने बाद झाल्याने क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी २५वे षटक बांगलादेश संघाचा कर्णधार आणि फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने केले. शाकिबने या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर सदीरा समरविक्रमाला झेलबाद केले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज पुढचा फलंदाज म्हणून क्रीजवर आला. मात्र मॅथ्यूजला योग्य हेल्मेट आणता आले नाही. क्रीजवर येताच त्याने पॅव्हेलियनच्या दिशेने सहकारी खेळाडूंना आणखी एक हेल्मेट आणण्यासाठी इशारा केला. पण यादरम्यान शाकिबने मैदानावरील पंचांना 'टाइम आऊट' नियम लागू करण्याचे आवाहन केले. यानंतर पंचांकडून अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊटच्या नियमानूसार बाद करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर १८७७ पासून कसोटी क्रिकेट खेळले जात आहे. यानंतर एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूप आले. पण तिन्ही फॉरमॅटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने एखादा खेळाडू बाद झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचा अशाप्रकारे 'टाइमआऊट' होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अँजेलो मॅथ्यूजची विकेट सोशल मीडियावर ट्रेडिंग झाली आहे.
नेमका 'टाइम आउट' नियम काय?
४०.१.१. नुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज ३ मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. नवीन फलंदाज तसे न करु शकल्यास विरोधी संघ फलंदाजाच्या विरोधात अपील करू शकतो. याला 'टाइम आउट' म्हणतात. ४०.१.२ नुसार, या निर्धारित वेळेत (३ मिनिटे) नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला नाही, तर पंच नियम १६.३ ची प्रक्रिया पाळतील. परिणामी, वरील नियमाप्रमाणेच फलंदाजाला 'टाइम आऊट' घोषित केले जाईल.