World Cup 2023 मध्ये अनेक रोमांचक सामने आणि अनेक वाद निर्माण झाले आहेत. मात्र सोमवारी (६ नोव्हेंबर) श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एक नवा वाद समोर आला आणि त्यावरून बऱ्याच चर्चांना उधाण आले. श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजच्या Timed Out होण्याचा हा वाद होता. मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइमआउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. पण मॅथ्यूजच्या आधी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर देखील टाइमआऊट होण्याची वेळ ओढवली होती. त्यातून तो कसा बचावला, त्याचा मजेदार किस्सा जाणून घेऊया.
गांगुलीबरोबर १६ वर्षांपूर्वी घडला होता किस्सा
२००७ साली एक किस्सा घडला होता. त्यावेळी गांगुली बाद झाला असता तर आज मॅथ्यूज टाइमआऊट होणारा दुसरा फलंदाज ठरला असता. पण त्यावेळी दादा त्या प्रसंगातून थोडक्यात बचावला. त्यावेळी नक्की काय घडलं होतं? ते प्रकरण काय होतं? अन् ३ मिनिटांची वेळ असूनही तब्बल ६ मिनिटं उशीर झाल्यावरही गांगुली त्यातून कसा बचावला होता?
वास्तविक, ही गोष्ट आहे २००७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची. जेव्हा भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन कसोटी सामना खेळला जात होता. त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या षटकांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स ६ धावांत गमावल्या. वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर बाद झाले. यानंतर सचिन तेंडुलकर येणार होता, मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो काही काळ मैदानाबाहेर राहिला. त्यामुळे तो निर्धारित वेळेपूर्वी फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण देखील त्यावेळी आंघोळीसाठी गेला होता. त्या दरम्यान सौरव गांगुली ट्रॅकसूटमध्ये फिरत होता. त्याला लगेच तयार होऊन मैदानात यावे लागले. सपोर्ट स्टाफचे लोक गांगुलीला झटपट तयार करण्यात गुंतले होते. एवढे सगळे करूनही गांगुलीला मैदानात येण्यास ६ मिनिटे उशीर झाला.
नियम काय होता?
नियमानुसार त्याला मैदानात जाऊन पुढचा चेंडू ३ मिनिटांच्या खेळायचा होता. गांगुली 6 मिनिटांच्या विलंबाने मैदानात आला तेव्हा पंचांनी सर्व नियम आणि प्रकरण दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला समजावून सांगितले होते. मात्र त्यादरम्यान स्मिथने वेळ काढण्याबद्दल अपील केले नाही. त्याने आत्मा जपला आणि गांगुलीला वेळ काढू दिला नाही. अशाप्रकारे गांगुलीने त्या सामन्यात वेळ मारून नेली.
हेल्मेटमुळे अँजेलो मॅथ्यूज झाला Timed Out
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात अँजेलो मॅथ्यूज वेळेवर क्रीझवर आला होता, परंतु त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली आणि त्याने पहिला चेंडू खेळण्यास उशीर केला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनच्या अपील केले. १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या फलंदाजाची वेळ संपली.