मेलबोर्न : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे कोच जस्टिन लॅंगर यांची कोचिंग शैली खेळाडूंना पसंत नाही. ते लहान लहान गोष्टींवर मोठे दडपण आणतात, चिडचीड करतात शिवाय तिन्ही प्रकारच्या शैलींच्या जबाबदारीचे ओझे असल्याने हे काम लँगर यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे माध्यमांतील वृत्तामध्ये म्हटले आहे. अनेक खेळाडूंना त्यांची प्रशिक्षण शैली पचनी पडत नसल्याचे स्वर ऐकायला येत आहेत. भारताविरुद्ध दारुण पराभवानंतर खेळाडूंमधील या असंतोषाला वाचा फुटली. कोच लँगर यांनी मात्र या वृत्तात सत्यता नाही, असे स्पष्टीकरण दिले. अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताने ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने धूळ चारली. ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’च्या वृत्तानुसार काही जण लँगर यांच्या व्यवस्थापन शैलीवर नाराज आहेत.ड्रेसिंग रूममधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‘अनेक महिने बायो बबलमध्ये वास्तव्य केलेल्या खेळाडूंना लँगर यांची कोचिंग शैली पसंत नाहीच. त्यांचा स्वभाव आणि मूड कसा राहील याचा वेध घेणे कठीण असते. लँगर हे गरजेपेक्षा अधिक चुका शोधण्यात वेळ घालवतात. लँगर यांनी ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीत उपाहारादरम्यान खेळाडूंना आकडेवारी सोपवून नेमकी कशी गोलंदाजी करायची याविषयी निर्देश दिले होते.’लँगर यांनी मात्र सर्व वृत्त खोडसाळ असल्याचे सांगून माझ्यात आणि खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या वृत्तास नकार दिला. ते म्हणाले, ‘हे सर्व चुकीचे आहे. कोचिंग ही लोकप्रियता मिळविण्याची स्पर्धा नव्हे. खेळाडूंना वाटत असेल की आम्हाला प्रत्येकवेळी कुणी जोक ऐकवून हसवत ठेवावे, तर ते शक्य नाही. मी तर गोलंदाजांसोबत अधिक आकडेवारीवर चर्चा करीत नाही. मागील काही महिन्यांचा अनुभव पाहता यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे वाटायला लागले.’
२०१६ ला ॲशेस दौऱ्यावर जाणाऱ्या संघातून सुटी घेण्याचा निर्णय कोच डेरेन लेहमन यांनी घेताच जस्टिन लॅंगर यांची अंतरिम कोच म्हणून नेमणूक झाली. २०१७ ला सीएकडून झालेल्या प्रेक्षकांच्या पसंतीच्या सर्वेक्षणात मागील ४० वर्षांतील सर्वोत्तम ॲशेस इलेव्हनमध्ये लॅंगर यांचे नाव आले. ३ मे २०१८ रोजी डेरेन लेहमन यांनी कोच पदाचा राजीनामा देताच लॅंगर यांना राष्ट्रीय संघाचे कोच नियुक्त करण्यात आले.