नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) युवा खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. वेस्ट इंडिज आणि यूएस येथे होणाऱ्या 2024 टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडू जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळल्याने अनुभव मिळेल असा विश्वास कुंबळे यांना आहे. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरू झाल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्या देशांतर्गत टी-20 लीग सुरू केल्या, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग (BBL), पाकिस्तान सुपर लीग (PSL), कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे.
जगभरातील खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे. मात्र कोणत्याही भारतीय खेळाडूला विदेशी लीगमध्ये खेळण्याची बीसीसीआय परवानगी देत नाही. भारतीय संघाचे दिग्गज कुंबळे यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, "मला वाटते की तेथील परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव नक्कीच मदत करतो. भारतीय क्रिकेटच्या वाढीस मदत होत असल्याचे आपण पाहिले आहे. आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंच्या आगमनाचा भारतीय क्रिकेटला नक्कीच फायदा झाला आहे."
भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी
अनिल कुंबळे यांनी अधिक म्हटले की, "जर कोणत्या युवा खेळाडूला विदेशात पाठवल्याने त्याच्या खेळीत सुधारणा होत असेल तर तसे करायला हवे." या आधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील हिच भूमिका मांडली होती. "2024 च्या विश्वचषकासाठी तुमच्याकडे जे काही लागेल ते तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. विश्वचषकासाठी तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल", अशा शब्दांत द्रविड यांनी विदेशी लीगबाबत भाष्य केले होते. या विश्वचषकात भारतीय संघात असे अनेक खेळाडू होते ज्यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नव्हता. तर दुसरीकडे इंग्लंडच्या खेळाडूंना बीग बॅश लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यात कर्णधार जोस बटलर आणि त्याचा सलामीचा जोडीदार ॲलेक्स हेल्सचाही समावेश आहे.
हेल्स-बटलरसमोर भारतीय गोलंदाज गारद
2022च्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना एकही बळी पटकावता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करून फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि 80 तर ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Anil Kumble has demanded BCCI to allow Indian players to play in foreign leagues
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.