नवी दिल्ली : काळानुसार क्रिकेटमध्येही अनेक बदल होत गेले... नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आणि हा खेळ जगभरातील चाहत्यांचे अधिक मनोरंजन करू लागला. भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यानेही असाच एक नवा शोध लावला आहे. इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंबळेने फलंदाजांसाठी 'पॉवर बॅट' तयार केली आहे.
या बॅटमध्ये क्रेडिट कार्डच्या साईजची आणि पाच ग्रामपेक्षा कमी वजनाची चिप बसवण्यात आली आहे. बेंगळुरुच्या आर व्ही महाविद्यालयातून इंजीनियरिंगची पदवी घेणाऱ्या कुंबळेने तिला 'पॉवर बॅट' असे नाव दिले आहे. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने कुंबळेने हे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. बॅटवर ती चिप चिटकवण्यात आली असून त्यातून फलंदाजाला बरीच उपयोगी माहिती मिळणार आहे. त्याशिवाय सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीलाही मोठी मदत होणार आहे.
तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये या तंत्रज्ञानाचा यशस्वी चाचणी करण्यात आली. कुंबळेने सांगितले की,''हे तंत्रज्ञान केवळ फलंदाजांसाठीच नव्हे तर गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. चिपमधील डाटातून गोलंदाजाला प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या शैलीचा अभ्यास करता येणार आहे.''