मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने चौथ्या क्रमांकासाठी बरेच प्रयोग केले. कर्णधार विराट कोहलीनं या स्थानावर खेळावे, अशी इच्छा प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलाही, परंतु या प्रयोगाचा भारतीय संघाला फार फायदा झाला नाही. 2-0 अशी आघाडी असूनही भारताला पाच सामन्यांची मालिका 2-3 अशी गमवावी लागली. कोहलीच्या या प्रयोगावर माजी प्रशिक्षक व कसोटीपटू अनिल कुंबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 48 वर्षीय कुंबळे यांनी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने चौथ्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनीला खेळवावे, असा सल्ला दिला आहे.
चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्यायांची चाचपणी करूनही भारतीय संघ अंतिम निर्णयावर आलेला नाही. या क्रमांकासाठी भारतीय संघात श्रेयस अय्यर, मनिष पांडे, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे यांचा पर्याय वापरल्यानंतर अंबाती रायुडूला वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या मालिकेत चौथ्या क्रमांकावर संधी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांत रायुडूला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चौथ्या व पाचव्या वन डेत लोकेश राहुल व रिषभ पंत यांना संधी मिळाली. पण, त्यातही फार यश मिळाले नाही.
कुंबळेच्या मतानुसार धोनी हाच या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहे. शिखर धवन, रोहित शर्मा, कोहली आणि धोनी ही क्रमवारी भारताला 70-80 टक्के सामने जिंकून देऊ शकते. ''मागील काही वर्षांत भारतीय संघाने मिळवलेले विजय हे अव्वल तीन फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर होते. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. 50 षटकांच्या सामन्यांत अव्वल तीन फलंदाजांनी दमदार कामगिरी करणे महत्त्वाचे असते, परंतु मला अजूनही वाटते की धोनीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं,'' असे कुंबळे यांनी सांगितले.
पण, अव्वल तीन फलंदाजांवर अधिक अवलंबून राहणे 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महागात पडल्याची आठवणही कुंबळेंनी करून दिली. ते म्हणाले,''उपांत्य किंवा अंतिम फेरीच्या सामन्यात अव्वल तीन फलंदाज अपयशी ठरल्यावर काय करणार? अशावेळी खेळपट्टीवर नांगर रोवून संघाची धुरा सांभाळणारा खेळाडू हवा. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मधल्या फळीकडे अनुभव नाही. मधल्या फळीतही सातत्याचा अभाव जाणवला आहे.''