चेन्नई सुपर किंग्जसाठी तिसरे व एकूण सहावे आयपीएल जेतेपद मिळवून अंबाती रायुडूने आयपीएल कारकिर्दीचा शेवट केला. भारतासाठी ५५ वन डे आणि सहा ट्वेंटी-२० सामने खेळूनही, रायडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवता आले नाही. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपच्या स्पर्धेतून त्याला वगळल्याने खूप वाद झाला होता. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाच्या शोधात होते आणि रायुडू हा उत्तम पर्याय होता.
रायुडू भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठी परफेक्ट खेळाडू होता. IPL 2018 मध्ये त्याने ६०२ धावा केल्या होत्या. रायुडूने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत २१ वन डे सामन्यांत १ शतक व चार अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या. असे असूनही इंग्लंडमधील वन डे वर्ल्ड कपसाठीच्या संघातून त्याचे नाव आश्चर्यकारकपणे गायब झाले. त्याऐवजी त्यांनी KL राहुलला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पुढे केले आणि त्या वर्षीच्या IPL मधील कामगिरीच्या आधारे अष्टपैलू विजय शंकरला संधी दिली.
भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या मते रायुडूला इंग्लंडला न नेणे ही सर्वात मोठी चूक होती. सहा महिने या विशिष्ट भूमिकेसाठी तयार केल्यानंतर रायुडूला शेवटच्या क्षणी वगळणे तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून मोठी चूक होती असे माजी भारतीय प्रशिक्षकाचे मत आहे. "रायडूने २०१९ चा वर्ल्ड कप खेळायला हवा होता. ही खूप मोठी घोडचूक होती, यात काही शंका नाही. तुम्ही त्याला या भूमिकेसाठी इतके दिवस तयार केले आणि त्याचे नाव संघातून गायब झाले," कुंबळे जिओ सिनेमाशी बोलताना हे मत मांडले.