Join us  

IPL 2020 वर टांगती तलवार; आयसीसीच्या बैठकीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय!

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूनीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 8:07 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूनीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) खेळवण्याच्या आशा अवलंबून होत्या. त्यानुसार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत चर्चा झाली. पण, या बैठकीत आयसीसीनं आणखी काही काळ वाट पाहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि अन्य निर्णय घेण्यासाठी आयसीसी 10 जूनपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

2021ला भारतात ट्वेंटी-20वर्ल्ड कप असल्याने 2020 चा वर्ल्ड कप 2022 मध्ये घेण्यात येईल, अशा चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र सर्व चर्चांवर आयसीसीने अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येईल का, हे अद्याप निश्चित नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखा लांबणीवर टाकण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल,’ असे स्पष्टीकरण आयसीसीच्या प्रवक्त्याने दिले होते. चेअरमन शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली टेली कॉन्फरेन्सद्वारे ही बैठक पार पडली.    

ICCच्या वेट अॅड वॉच भूमिकेमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमावर टांगती तलवार कायम आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर या विंडोत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीसीसीआयला आयपीएल न झाल्यास ४००० कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे बीसीसीआयचे लक्ष होते. पण, आता त्यांना आणखी प्रतीक्षा पाहावी लागेल. 

दरम्यान, यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेतिलाच उत्सुक नसल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं आहे. त्याऐवजी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपचे यजमानपद त्यांना मिळावे, अशी विनंती आयसीसीकडे केली आहे.

भारत सरकारकडून मिळत नसलेल्या कर सवलतीमुळे आयसीसीनं 2021चं यजमानपद काढून घेण्याची धमकी बीसीसीआयला दिली आहे. त्यात 2020च्या स्पर्धा आयोजनाचं संकटही त्यांच्या डोक्यावर आहे. 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022मध्ये स्थगित करण्यात येईल, अशी चर्चा होती. पण, आयसीसीनं बुधवारी हे वृत्त फेटाळून लावले. ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच खेळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयसीसीनं स्पष्ट केलं. 

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर आर्थिक संकट ओढावलं आहे आणि त्यामुळे यंदाच्या एवजी त्यांना 2021मध्ये वर्ल्ड कप आयोजन करायचा आहे, 2022मध्ये नाही. त्यामुळे आता आयसीसी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020आयसीसी