कराची : पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने गौप्यस्फोट करीत केवळ हिंदू असल्यामुळे दानिश कनेरिया याला संघातील इतर खेळाडूंकडून वाईट वागणूक दिली जात होती, असा खुलासा केला. शोएबच्या या दाव्यावर आता खुद्द दानिशने खुलासा केला आहे, शोएबचे कथन सत्य असून पाकिस्तान संघात आपल्यासोबत भेदभाव करण्यात आल्याचे म्हटले आहे. शोएब अख्तरने हा खुलासा केल्याबद्दल दानिशने त्याचे आभार मानले शिवाय त्याचा प्रत्येक शब्द खरा असल्याचा दुजोरा दिला. कनेरिया स्पॉट फिक्सिंगप्रकरणी २०१२ पासून आजन्म बंदीचा सामना करीत आहे.
‘शोएब अख्तरने सत्य सांगितले आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाºया सर्व खेळाडूंची नावे मी जाहीर करणार. आधी या विषयावर बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण आता मी बोलणार,’ असे दानिशने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते, असा खुलासा केला होता. पाकिस्तानी संघात कसोटी सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणाºया गोलंदाजांच्या यादीत दानिश चौथ्या क्रमांकावर आहे. दानिश हा पाकिस्तान क्रिकेट संघात स्थान मिळवणारा दुसरा हिंदू धर्मीय खेळाडू आहे. याआधी अनिल दलपत पाकिस्तान संघाकडून खेळले आहेत.
शोएबने या विषयावर भाष्य केल्याने आता आपल्याला धैर्य मिळाले असून ज्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली ‘त्या’ सर्व खेळाडूंची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे दानिशने म्हटले आहे. एकीकडे संघात काही खेळाडू दुजाभाव करत असताना युनिस खान, इंझमाम, मोहम्मद युसूफ, शोएब यांच्यासारखे खेळाडू चांगली वागणूक द्यायचे, असेही कनेरियाने स्पष्ट केले.
Web Title: Announces names of discriminating players - Kaneria
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.