धर्मशाला : नेदरलँड्सने यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील दुसरा धक्कादायक निकाल नोंदवताना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला ३८ धावांनी नमवले. याआधी रविवारी अफगाणिस्तानने गतविश्वविजेत्या इंग्लंडला नमविण्याचा पराक्रम केला होता. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर नेदरलँड्सने प्रतिकूल परिस्थितीतून पुनरागमन करत ४३ षटकांत ८ बाद २४८ धावा केल्या. यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला ४२.५ षटकांत २०७ धावांत गुंडाळले.
पावसामुळे दोन तास उशिराने सुरू झालेला हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला. धावांचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ ८९ धावांवर गारद करत नेदरलँड्सने वर्चस्व मिळवले. डेव्हिड मिलर आणि केशव महाराज यांनी अपयशी झुंज दिली. लोगान वॅन बीकने ३, तर पॉल वॅन मीकरेन, रोएलोफ वॅन डेर मर्व्ह आणि बास डी लीडे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकातही नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.
त्याआधी नेदरलँड्सने ७ बाद १४० धावा अशी अवस्था झाल्यानंतरही आव्हानात्मक मजल मारली. सातव्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने आक्रमक अर्धशतक झळकावले. लुंगी एनगिडी, मार्को यान्सेन व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. एडवर्ड्सने आठव्या गड्यासाठी रोएलोफ वॅन डेर मर्व्हसोबत ३७ चेंडूंत ६४ धावांची वेगवान भागीदारी केल्यानंतर आर्यन दत्तसोबत १९ चेंडूंत नाबाद ४१ धावांचा चोप देत नेदरलँड्सला भक्कम स्थितीत आणले.
एकेकाळचा संघसहकारी, आता कर्दनकाळ
नेदरलँड्सच्या या विजयात रोएलोफ वॅन डेर मर्व्ह चमकला. जन्माने दक्षिण आफ्रिकन असलेला मर्व्ह याने दक्षिण आफ्रिकेकडूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना १३ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले. यानंतर जून २०१५ मध्ये त्याने नेदरलँड्सचे नागरिकत्व मिळवले आणि तेव्हापासून तो नेदरलँड्सचा महत्त्वाचा खेळाडू बनला. या सामन्यात त्याने कर्णधार तेम्बा बवुमा आणि रस्सी वॅन डेर डुस्सेन यांना स्वस्तात बाद करत दक्षिण आफ्रिकेला जबर हादरे दिले.
दक्षिण आफ्रिका एकमेव असा संघ ठरला, ज्यांनी कसोटी दर्जा नसलेल्या नेदरलँड्सकडून टी-२० आणि वनडे सामन्यांच्या विश्वचषकात पराभव पत्करला आहे.
रबाडा ठरला ‘नवरत्न’
रबाडाने नेदरलँड्सविरुद्ध दमदार मारा करत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा रबाडा दक्षिण आफ्रिकेचा नववा गोलंदाज ठरला.
Web Title: Another shocking match icc world cup! The Netherlands. Strong victory over Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.