भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा प्रवास हा अनेक युवा क्रिकेटपटूंना प्रेरणादायी आहे. तिकीट कलेक्टर ते टीम इंडियाचा कर्णधार... ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या महत्त्वांच्या स्पर्धा जिंकून देणारा कर्णधार... कॅप्टन कूल धोनी आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एका तिकीट कलेक्टरची एन्ट्री झाली आहे. रणजी करंडक स्पर्धेत टीम इंडियातील अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ या प्रमुख फलंदाजांना बाद करून तो चर्चेत आला. कोण आहे हा गोलंदाज?
हिमांशु सांगवान असं या खेळाडूचं नाव आहे आणि तो रणजी करंडक स्पर्धेत रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करतो. डिसेंबर 2019मध्ये या गोलंदाजांना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या सामन्यात त्यानं सहा विकेट घेत रेल्वेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हिमांशूच्या भेदक माऱ्यामुळे रेल्वेनं तो सामना दहा विकेट्स राखून जिंकला होता. त्यानं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यात रहाणे, पृथ्वी शॉ सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता. कामगिरीमुळे हिमांशु चर्चेत आलाच आहे, परंतु तो तिकीट कलेक्टर असल्यानं त्याची तुलना धोनीशी होऊ लागली आहे.
24 वर्षीय हिमांशु नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर तिकीट कलेक्टर आहे. त्यानं आपल्या यशाचं श्रेय ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राला दिले आहे. मॅक्ग्राच्या एमआरएफ पेस फाऊंडेशरमध्ये हिमांशुनं ट्रेनिंग घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हिमांशुनं सांगितलं की,''ग्लेन मॅक्ग्राला मी आदर्श मानतो. एमआरएफ फाऊंडेशनमध्ये मला त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला रणजी करंडक स्पर्धेत खूप फायदा झाला.''
रेल्वेविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पहिला डाव 114 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर रेल्वेनं कर्णधार कर्ण शर्माच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 266 धावा केल्या. दुसऱ्या डावात हिमांशुनं 5 विकेट्स घेत मुंबईचा संपूर्ण संघ 198 धावांत माघारी पाठवला. 47 धावांचे माफक लक्ष्य रेल्वेनं 10 विकेट राखून पार केले.