मुंबई : भारतीय पुरुषांच्या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे. पण आता विराटच्या पाठोपाठ त्याची पत्नी अनुष्का शर्माही भारताची कर्णधार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एवढेच नव्हे, तर अनुष्का वेगवान गोलंदाजी करण्यासाठी सज्जही झाली आहे. देशाचे नेतृत्व करण्याची संधी एका जोडप्याला मिळावी, अशी गोष्ट यापूर्वी झालेली नसावी.
क्रिकेटनं विराट आणि अनुष्काला एकत्र आणलं. सध्या सर्वात क्यूट कपल म्हणून विरुष्काचे नाव आघाडीवर आहे. विराटच्या टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यावर अनुष्का अनेकदा दिसली आहे. पण, आता अनुष्का क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अनुष्काला यापूर्वी कधीच क्रिकेट खेळताना पाहिले गेले नाही आणि तिला थेट भारताचे कर्णधारपद कसे देण्यात आले.
भारतीय संघाची सर्वात यशस्वी गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्यावर तयार होत असलेल्या बायोपिकमध्ये अनुष्का प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अनुष्का मैदानात वोगवान गोलंदाजीचा सराव करण्यासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. अनुष्का यावेळी झुलनबरोबर मैदानात पाहिली गेली. यावेळी अनुष्काने भारताच्या संघाचा ड्रेस परीधान केला होता. सोशल मीडियावर हे फोटो आता चांगलेच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
भारतीय महिला संघाच्या यशस्वी वाटचालीत झुलनचा महत्त्वाचा वाटा आहे. तिचा हा क्रिकेटप्रवास चित्रपटाच्या रूपानं सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. यामध्ये झुलनची भूमिका अनुष्का शर्मा निभावणार असून ती या सिनेमामध्ये भारतीय महिला संघाची कर्णधार दाखवली गेली आहे. कारण झुलननेही भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद भुषवले होते.
37 वर्षीय झुलननं 2002मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले आणि जगातील सर्वात यशस्वी जलदगती गोलंदाज म्हणून तिनं नाव कमावलं. तिनं 10 कसोटी, 182 वन डे आणि 68 ट्वेंटी-20 सामन्यांत 321 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान झुलननं पटकावला आहे.
झुलन निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती भविष्यात गोलंदाज प्रशिक्षक किंवा सल्लागार म्हणून काम पाहू शकते. बॉलिवूडमध्ये अनेक खेळाडूंवर बायोपिक निघाले आहेत. महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम, भाग मिल्खा भाग या बायोपिकनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.