बंगळुरु - बंगळुरु येथे विराट कोहलीला गेल्या दोन मोसमातील शानदार कामगिरीसाठी पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना विराट कोहली भावूक झाला होता.
२०७-१७ आणि २०१७-१८ मध्ये दमदार शानदार कामगिरीसाठी विराट कोहलीला पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोच रवी शास्त्री यांनी विराटला ट्रॉफ्री देऊन सन्मानित केले. रवी शास्त्री यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना विराट भावूक झाला होता. यावेळी बोलताना तो म्हणाला, माझी बायको प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे माझ्यासाठी या पुरस्काराची किंमत आणि महत्व आणखीच वाढले आहे. अनुष्का माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. असे म्हणत विराट कोहलीने आपले प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केले. यावेळी प्रेक्षकात बसलेल्या अनुष्काने त्याला चांगलीच दाद दिली.
पॉली उम्रीगर या पुरस्कारावर कोहलीने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. यापूर्वी कोहलीने 2011-12 आणि 2013-14 आणि 2016-17 मध्येही हा पुरस्कार पटकावला आहे. चार वेळा पुरस्कारावर नाव कोरणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे.
सलग दुसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेला कर्णधार विराट कोहली मंगळवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख केंद्र ठरला. अंशुमान गायकवाड आणि सुधा शाह यांना यावेळी सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अफगाणिस्तानच्या संघाचीही विशेष उपस्थिती होती. गुरुवारपासून अफगाणिस्तान भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार असून हा त्यांचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. त्याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने यावेळी एमएके पतौडी व्याख्यान दिले. या सोहळ्याच्या निमित्ताने माजी क्रिकेटपटू आणि नव्या दमाचे खेळाडू एकाच छताखाली उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे जलज सक्सेना, परवेझ रसूल आणि कृणाल पांड्या यांना देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.