मेलबर्न : जैवसुरक्षा नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवत भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल या पाच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळात वाद निर्माण झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सिडनीत सुरू होणार आहे. तूर्तास येथील एका हॉटेलात खेळाडूंचा मुक्काम आहे. शनिवारी वर उल्लेखलेले सर्व खेळाडू भोजनासाठी एका हॉटेलात गेले असता तेथील एका भारतीय चाहत्याने त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमावर अपलोड केली. तसेच सर्व खेळाडूंच्या जेवणाचे बिलही या चाहत्याने अदा केले. शिवाय ऋषभ पंतला त्याने मिठीही मारली. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी जैवसुरक्षा नियमाचा भंग केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केला.
चाहत्याचे घूमजावज्या चाहत्याने पाचही क्रिकेटपटूंच्या भोजनाचे बिल अदा केले तसेच पंतला आपण मिठी मारल्याचे ट्विट केले त्याने आता घूमजाव केले आहे. मी पंतला मिठी मारलीच नाही, असे त्याने स्पष्ट केले.
जैवसुरक्षा म्हणजे काय?महासाथीमुळे क्रिकेटपटूंना इतरत्र प्रवासाची मनाई आहे. चाहत्यांना भेटणे, त्यांच्याशी हस्तांदोलन करणे याला मज्जाव आहे. सामाजिक अंतराचे पालन बंधनकारक आहे. या सर्व गोष्टींना जैवसुरक्षा असे संबोधले जाते.
सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटकाकोलकाता : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून अँजिओप्लास्टीची गरज आहे किंवा कसे, याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोप खोडसाळपणाचे - बीसीसीआयभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ (सीए) यांनी संयुक्तपणे याची चौकशी सुरू केली आहे. भारतीय खेळाडूंवरचे आरोप खोडसाळपणाचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. खेळाडू काही खरेदीसाठी बाहेर पडले होते. पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्यांनी एका हॉटेलचा सहारा घेतल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे.