नवी दिल्ली : एखाद्या फलंदाजाच्या पायाला चेंडू लागावा. LBWची अपील केली जावी. पंचांनी ती नाकारावी. पण तो फलंदाज रन आऊट व्हावा, असा नजारा क्रिकेटच्या मैदानात तुम्ही पाहिला नसेल. पण अशी गोष्ट घडली आहे आणि या चमत्कारीक गोष्टीचा व्हिडीओही चांगलाच वायरल झाला आहे.
ही गोष्ट आहे ती दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यातली. सामना सुरु होता चेन्नईमध्ये. ऑस्ट्रेलियाच्या ' अ ' संघाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ' अ ' संघाला 32 धावांनी पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची पहिली फलंदाजी होती. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 322 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा 10 धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याचा पॅडवर एक चेंडू आदळला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने LBWची अपील केली. त्यावेळी पंचांनी ही अपील नाकारली आणि त्याला नाबाद ठरवले. पण त्यावेळी ख्वाजा हा पंचांचा निर्णय ऐकण्यात एवढा मग्न होता की, आपण क्रीझबाहेर आहोत हे त्याला कळले नाही. त्यावेळी एका खेळाडूने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. त्याने हा चेंडू स्टम्पवर मारला आणि ख्वाजा रन आऊट होऊन तंबूत परतला.