मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी क्रिकेट जगतातील नामांकित माजी क्रिकेटपटूंनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. या पदासाठी भारताच्या पुरुष संघाला विश्वचषक जिंकवून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी अर्ज केला आहे. त्याचबरोबर यापूर्वी हे पद भुषवणाऱ्या रमेश पोवार यांनीही अर्ज पाठवला आहे.
वेंकटेश प्रसाद यांनी भारताकडून क्रिकेट खेळले आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक हे पदही भूषवले आहे. आता त्यांनी महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर आणि डब्ल्यू वी रमण यांनी या पदासाठी अर्ज केला आहे.
हर्षल गिब्ज, दिमित्री मस्कारेन्हस, ट्रेंट जॉन्सन, ब्रॅड हॉग यांनीही महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. या पदासाठी फक्त एकाच महिला क्रिकेटपटूचा अर्ज केला आहे. कल्पना वेंकटाचार यांनी या पदासाठी अर्ज केला आहे. या साऱ्यांच्या मुलाखती उद्या मुंबईमध्ये घेण्यात येणार आहेत.
मिताली राज आणि रमेश पोवार या वादात महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी पोवार यांनाच पुन्हा कोच बनवा, अशी मागणी केली आहे. सीओए अध्यक्ष विनोद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमन आणि स्मृती यांनी पोवार यांना २०२१ पर्यंत कोच बनविण्याची मागणी केली. पोवार यांचा अंतरिम कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला.