निनाद भोंडे, उपसंपादक सा म्हणजे जहर, शांती न लाभू दे क्षणभर, मानवासी बनवितो वानर, चंचल चित्त करोनिया...’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओळी सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना तंतोतंत लागू पडतात की काय, असा प्रश्न पडायला लागला आहे. त्याला कारण आहे ते काही दिवसांपूर्वी कपिल देव यांनी केलेली टीका. ते म्हणाले होते, ‘भारतीय खेळाडू पैशामुळे आलेल्या अहंकारात आकंठ बुडालेले आहेत. आर्थिक हितसंबंधांपुढे त्यांना देश वगैरे काहीही दिसत नाही. शिवाय आपण जर खेळताना चुकत असू, तर वेळप्रसंगी अनुभवी खेळाडूंकडून मोलाचे धडे घ्यायचे असतात, याचाही विसर खेळाडूंना पडलेला आहे. कदाचित पैशामुळे आलेली ही मग्रुरीच असावी.’ सद्य:स्थितीचा सारासार विचार केला तर कपिल देव काही चुकीचे बोलले, असे अजिबात वाटत नाही. भारतीय खेळाडूंची एकंदर वर्तणूक बघितली तरी याचा प्रत्यय येऊ शकतो.
देश दुय्यम स्थानी आयपीएलची सुरुवात झाली आणि क्रिकेटमध्ये पैशांचा अक्षरश: महापूर आला. या वाहत्या गंगेत आपणही हात धुवून घ्यावेत, या मानवी प्रवृत्तीप्रमाणे अनेक खेळाडू पुढे सरसावले. यात जे काहीअंशी अपयशी ठरले, त्यांच्यासाठी बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठ्या ब्रँडचे आंदण तयार होतेच. भारतीय क्रिकेटमधील या डोळे दीपवून टाकणाऱ्या साखळीमुळेच उदयोन्मुख खेळाडूंचा आणि त्यांच्या पालकांचा भर देशापेक्षा आयपीएल खेळण्याकडे वाढला. हा चुकलेला प्राधान्यक्रमच भारतीय क्रिकेटच्या अधोगतीचे प्रमुख लक्षण ठरू शकतो.
संघातील वरिष्ठ खेळाडूंविषयी तर काही बोलायलाच नको. कारण, रणजी क्रिकेट टाळण्यासाठी थकवा आणि दुखापतींचा पाढा वाचणारे हे सुपरस्टार आयपीएल मात्र एका पायानेही खेळायला तयार असतात. पैसा मुख्य कारण, हे सुज्ञांना अधिक सांगणे न लगे.
पैसा कमावण्यात गैर नाही, पण...पैसा कमावणे वाईट आहे का, तर अजिबात नाही. पण याच पैशामुळे खेळाडूंच्या प्राधान्यक्रमात देश या घटकाला जर दुय्यम स्थान मिळत असेल तर प्रश्न विचारले जाणारच. महेंद्रसिंग धोनी एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘मला रांचीत सेटल होण्यासाठी केवळ ३० लाखांची गरज आहे.’ पण सध्याचा धोनीच्या गाड्यांचा थाट बघितला तर कधी हे लाख ३० कोटींपर्यंत गेले असतील हे त्याला सुद्धा कळले नसेल. सचिन तेंडुलकर यानेही क्रिकेटमधून अफाट पैसा कमावला. पण या दोघांनी देशासाठी खेळताना कर्तव्यात कधी कसूर केली नाही. त्यामुळे त्यांचा पैसा इतरांच्या डोळ्यांत कधी खुपला नाही.
प्रश्न तर विचारले जाणारचएखाद्या नवख्या खेळाडूने आयपीएलचा साधा एक सामना जरी खेळला तरी चित्त थाऱ्यावर नसल्यासारखा तो वागायला लागतो. कपिल देव यांच्या टीकेला रवींद्र जडेजाने प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, ‘संघ पराभूत झाल्यावरच अशा गोष्टी निघत असतात.’ निघणारच ना भाऊ! गेल्या १० वर्षांपासून तुम्ही आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. प्रत्येक स्पर्धेत चोकर्सचा शिक्का घेऊन तुम्ही मायदेशी परतता. तरीही तुमच्यावर कोणी टीका करायची नाही, असं कसं चालेल. आयपीएलमध्ये तुम्ही कितीही देदीप्यमान विजय मिळवले तरी तुमची फ्रँचायझी म्हणजे काही देश नाही. जोपर्यंत तुमच्या प्राधान्यक्रमावर देश आधी येणार नाही, तोपर्यंत प्रश्नांची सरबत्ती तर होणारच.
गेल्या १० वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये भारत२०१४ टी-२० विश्वचषक उपविजेते२०१५ वन डे विश्वचषक उपांत्य फेरी२०१६ टी-२० विश्वचषक उपांत्य फेरी२०१७ चॅम्पियन ट्रॉफी उपविजेते२०१९ वन डे विश्वचषक उपांत्य फेरी२०२१ डब्ल्यूटीसी उपविजेते२०२१ टी-२० विश्वचषक गटफेरी२०२२ टी-२० विश्वचषक उपांत्य फेरी२०२३ डब्ल्यूटीसी उपविजेते