आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील खराह कामगिरीमुळे श्रीलंका क्रिकेटमध्ये सध्या मोठा वाद उद्धभवला आहे. श्रीलंका सरकारने संघाच्या खराब कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बरखास्तीची कारवाई केली आहे. तर संघटनेमध्ये सरकारने हस्तक्षेप केल्याने श्रीलंका क्रिकेटवर आयसीसीने बरखास्तीची कारवाई केली आहे. याचदरम्यान श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी श्रीलंकन क्रिकेटच्या दुरवस्थेसाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांना जबाबदार धरले होते. मात्र आता श्रीलंकन सरकारने अर्जुन रणतुंगा यांनी केलेल्या विधानाबाबत आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांची औपचारिकपणे माफी मागितली आहे.
श्रीलंकेच्या संसदीय अधिवेशनादरम्यान श्रीलंका सरकारमधील मंत्री हरिन फर्नांडो आणि कंचना विजेसेकरा यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की, याबाबतची जबाबदारी ही कुठल्या बाहेरील संस्थेपेक्षा श्रीलंकन प्रशासकांची आहे. विजयसेकेरा म्हणाले की, सरकार म्हणून आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांच्याबाबत करण्यात आलेल्या विधानाप्रति खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या संस्थांमधील उणिवांबबाबत आशियाई क्रिकेट परिषद किंवा इतर देशांकडे अंगुलीनिर्देश करू शकत नाही. ही एक चुकीची कल्पना आहे.
तर पर्यटनमंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितले की, राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेटवर आयसीसीने घातलेले निर्बंध हटवण्यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी संवाद सुरू केला आहे. तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी १६ नोव्हेंबर रोजी एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांना फोन केला आणि रणतुंगा यांनी केलेल्या विधानाबाबत खेद व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
तर हरिन फर्नांडो यांनी सांगितले की, मी आणि माझे कॅबिनेटमधील सहकारी कंचना विजयसेकेरा यांनी जय शाह यांच्यावर रणतुंगा यांनी केलेल्या विधानांबाबत माफी मागितली आहे. तसेच आयसीसीने घातलेल्या बंदीचे श्रीलंकेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. १९९६ मध्ये श्रीलंकेला विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या अर्जुन रणतुंगा यांनी श्रीलंकन क्रिकेटच्या दुरवस्थेचे खापर जय शाह यांच्यावर फोडले होते. तसेच जय शाह यांच्यावर श्रीलंकन क्रिकेट चालवत असल्याचा आणि ते बरबाद केल्याचा आरोप केला होता.