अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादला १४ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईने २० षटकांत ५ बाद १९२ धावा उभारल्या. यानंतर हैदराबादला १९.५ षटकांत १७८ धावांमध्ये गुंडाळत मुंबईने सलग तिसरा विजय मिळवला आणि गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली. कॅमरून ग्रीनचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला.
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात २० वे षटक टाकायला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले. अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना अर्जुन गोलंदाजीला आला अन् त्याने केवळ ५ धावा देत भुवनेश्वर कुमारची विकेट देखील घेतली. अर्जुन तेंडुलकरची ही विकेट आपल्या आयपीएल करकिर्दीतील पहिली विकेट ठरली.
सामना संपल्यानंतर अर्जुनची मुलाखत घेण्यात आली. यामध्ये अर्जुनने सचिन तेंडुलकरबाबतही भाष्य केलं. मला बॉलिंग करण्यास खूप आवडते. मी कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करु शकतो. आम्ही [सचिन आणि तो] क्रिकेटबद्दल खूप बोलतो. डावपेच कसे असावे, योजना कशी असावी, यावर आम्ही चर्चा करतो. मी या सामन्यात अखेरचे षटक टाकत असताना चेंडूची दिशा आणि टप्पा यार लक्ष केंद्रीत केले होते, असं अर्जुनने सांगितले.
दरम्यान, अर्जुनने आज २.५-०-१८-१ अशी स्पेल टाकली आणि त्यात ९ निर्धाव चेंडू होते. या कामगिरीनंतर सचिननं खास ट्विट केलं. मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली. कॅमेरून ग्रीनने फलंदाजी व गोलंदाजीत प्रभावी खेळ केला. इशान व तिलक यांनी फलंदाजीत चांगलं योगदान दिलं. आयपीएल दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. आणि अखेर तेंडुलकरने आयपीएलमध्ये विकेट मिळवली, असं सचिन म्हणाला.