Join us  

मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरसाठी 5 लाखांची बोली, खेळणार 'या' संघाकडून

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 3:07 PM

Open in App

मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे. मागील अनेक वर्ष कामगिरीत सुधारणा होण्यासाठी अर्जुन झटत आहे. त्याच्या या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आणि मुंबई ट्वेंटी-20 लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी होणाऱ्या लिलावात त्यानं वरिष्ठ गटात प्रवेश केला आहे. शनिवारी मुंबई ट्वेंटी-20 लीगसाठी झालेल्या लिलावात अर्जुनला कोणता संघ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्जुनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस रंगली, परंतु त्याला आकाश टायगर्स MWS संघाने चमूत घेतले. अर्जुनसाठी आकाश टायगर्स संघाने 5 लाख रुपये मोजले. अर्जुनकडे मुंबई 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गतवर्षी त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि दोन डावांत त्याला केवळ 14 धावा करता आल्या होत्या. मात्र, डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 चषक स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या 23 वर्षांखालील संघात स्थान मिळाले. गत महिन्यात त्यानं एका स्थानिक वन डे सामन्यात 23 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्वही केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 2018 पासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. पहिल्या मोसमात लीगला चांगला प्रतिसाद लाभला. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश होता आणि नाईट मुंबई उत्तर पूर्व संघाला जेतेपद पटकावण्यात यश आले. आकाश टायगर्स संघात अर्जुनला आंतरराष्ट्रीय गोलंदाज धवल कुलकर्णीचे ( 7 लाख)  मार्गदर्शन मिळणार आहे.  

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरमुंबई