Arjun Tendulkar in IPL 2022: भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. IPL च्या गेल्या दोन हंगामात अर्जुनला 'मुंबई इंडियन्स'च्या संघाने विकत घेतले. IPL 2021 मध्ये अर्जुनला २० लाखांच्या किमतीत तर IPL 2022 अर्जुनला ३० लाखांच्या किमतीत विकत घेण्यात आले. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय खराब झाली. सुरूवातीचे सलग सात ते आठ सामने हरल्यानंतर मुंबईने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. पण अर्जुनचा यात विचार करण्यात आला नाही. त्यावरून मुंबई इंडियन्सवर खूप टीका झाली. पण आता याच मुद्द्यावर एक नवी बाब समोर आली आहे.
"अर्जुनला संधी का मिळाली नाही असा सवाल प्रत्येक जण विचार होते. त्यावर मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्ड याने स्पष्टीकरण दिलं. "अर्जुन अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही. त्या आणखी मेहनत करण्याची गरज आहे. तुम्ही जेव्हा मुंबई इंडियन्ससारख्या टीममध्ये असता, तेव्हा त्या संघातून खेळण्यासाठी तुम्हाला तुमची जागा बनवावी लागते. २५ जणांच्या चमूत येणं वेगळं आणि ११ जणांच्या संघात स्थान मिळवणं वेगळं. अर्जुनला अजून खूप शिकावं लागणार आहे. त्याला खेळात खूप सुधारणा करण्याची गरज आहे", असं शेन बॉन्डने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना स्पष्टीकरण दिलं.
"जेव्हा तुम्ही एका आंतरराष्ट्रीय स्तराला समांतर असलेल्या स्पर्धेत खेळता त्यावेळी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतात. खेळासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणं आणि संघात आपली जागा निर्माण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्जुनला अद्याप त्याच्या बॅटिंग आणि फिल्डिंगमधील कामगिरीत खूप सुधारणा करणं गरजेचं आहे. मला अशी आशा आहे की तो झटपट आपला खेळ सुधारेल आणि संघात स्थान पटकावेल", असा विश्वास शेन बॉन्डने व्यक्त केला.