मुंबई : यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने नुकताच विश्वचषक जिंकला. या संघाचे मायदेशात आज जंगी स्वागत झाले. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. राज बावा या सामन्यातील नायक ठरला, तर शेख राशीद, यश धुल, रवी कुमार यांनीही ही स्पर्धा गाजवली.विश्वचषक गाजवल्यानंतर भारताचे हे युवा शिलेदार आयपीएल २०२२ खेळण्यासाठी उत्सुक आहेत; पण हाती आलेल्या बातमीनुसार विश्वचषक विजेत्या संघातील आठ खेळाडू हे आयपीएल २०२२ लिलावासाठी पात्र ठरत नाहीत. या खेळाडूंमध्ये शेख राशीद, दिनेश बाना, रवी कुमार या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.या खेळाडूंनी बीसीसीआयकडे त्यांचा समावेश लिलावात करून घेण्यासाठी विनंती केली आहे. बीसीसीआयच्या पात्रता निकषानुसार विश्वचषक विजेत्या संघातील आठ खेळाडू लिलावासाठी पात्र ठरत नाहीत. हरियाणाचा दिनेश बाना, आंध्र प्रदेशचा शेख राशीद यांच्यासह अंगक्रिष रघुवंशी, मानव पारख, निशांत सिंधू, ग्राव सांगवान, रवी कुमार व सिद्धार्थ यादव हे खेळाडू बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल लिलावासाठी पात्र ठरत नाहीत. बीसीसीआयच्या नियमानुसार अनकॅप ( राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू) खेळाडूला लिलावास पात्र होण्यासाठी दोन नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे.पहिला- खेळाडूचे वय १९ वर्षांपेक्षा अधिक असायला हवे, दुसरा - जर त्याचे वय १९ वर्षांखालील असेल तर किमान त्याने राज्याच्या संघाकडून किमान एक लिस्ट ए सामना ( वरिष्ठ स्तरावर) खेळायला हवा. भारताच्या विश्वविजेत्या संघातील आठ खेळाडू या निकषाची पूर्तता करत नाहीत.‘बीसीसीआयने काही विशेषप्रसंगी या नियमाचा पुनर्विचार करायला हवा आणि खेळाडूंना या नियमांमुळे संधी नाकारली जाऊ नये. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने दमदार कामगिरी केली आहे आणि त्यांना ही मोठी संधी मिळण्यापासून रोखता कामा नये,’ असे मत माजी सचिव रत्नाकर शेट्टी यांनी व्यक्त केले.
अर्जुन तेंडुलकर कसा ठरला पात्र?अर्जुन तेंडुलकरने मुंबईच्या सिनिअर संघात सय्यद मुश्ताक अली टी-२० लीगमधून पदार्पण केले होते. त्यात त्याने दोन सामन्यांत दोन बळी घेतले. मुंबईच्या सिनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल लिलावासाठी पात्र ठरला होता. तो आता पुन्हा लिलावात उतरला आहे आणि यावेळी त्याला मुंबई इंडियन्स पुन्हा घेतील का, याची उत्सुकता लागली आहे. त्याची मूळ किंमत ही २० लाख असणार आहे.
विश्वविजेत्या संघाचे मायदेशात आगमन- भारताचा १९ वर्षांखालील युवा संघ पाचव्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून मंगळवारी मायदेशी परतला. यश धूलच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडला पराभूत करीत विश्वचषकावर नाव कोरले होते. भारतीय संघ वेस्ट इंडिजहून ॲमस्टरडॅम आणि दुबईमार्गे बेंगळुरुत दाखल झाला. सायंकाळी सर्व खेळाडू अहमदाबाद येथे दाखल झाले.- बीसीसीआयने बुधवारी येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. आयसीसीच्या वतीने सर्व संघांच्या प्रवासाची व्यवस्था होते. भारतीयांचा प्रवास इकॉनाॅमी क्लासने झाल्याने खेळाडू फार थकले आहेत.- एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे संघासोबत वेस्ट इंडिजला गेले होते. ते स्वत: तसेच निवडकर्ते आणि पाच राखीव खेळाडूंसोबत वेगळे दाखल झाले. आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या साखळी सामन्याआधी भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळी या खेळाडूंना तेथे पाठविण्यात आले होते.