मुंबई - बाप तसा बेटा ही मराठीतील म्हण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरने खरी ठरवली आहे. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पणातच शतकी खेळी केली आहे. गोवा आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून खेळताना शानदार शतकी खेळी केली आहे. अर्जुन तेंडुलकरने १७८ चेंडूत शतकी मजल मारली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याच्या संघाने ५ बाद २१० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर अर्जुन तेंडुलकरने सुयश प्रभूदेसाईसोबत जबरदस्त भागीदारी केली. यादरम्यान सुयश प्रभूदेसाईने आपलं शतक पूर्ण केले. तर कालच्या नाबाद ४ धावांपरून पुढे खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरनेही आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकाच्या दिशेने कूच केली. अखेर षटकार ठोकत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
अर्धशतकी खेळीनंतर अर्जुन तेंडुलकरने अधिकच आक्रमक खेळ केला. तर दुसऱ्या बाजूने सुयश प्रभूदेसाईनेही राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत आपले दीडशतक पूर्ण केले. तसेच या दोघांनी भागीदारीमध्येही दीडशे धावांचा टप्पा ओलांडत गोव्याच्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने आपले रणजी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. वडील सचिन तेंडुलकर याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने पदार्पणातच शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने १२ चौकार आणि २ षटकार खेचले.
अर्जुन तेंडुलकर टी-२० लीगमध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. सचिन तेंडुलकरनेही प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करताना डिसेंबर १९८८ मध्ये गुजरातविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकले होते. वयाच्या केवळ १५ व्या वर्षी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली होती. सचिनने १२ चौकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली होती.