मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात तो गोव्याकडून खेळत आहे. दरम्यान, राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त कामगिरी करताना अर्धशतक पूर्ण केले. अर्जुन तेंडुलकरने ८ चौकार आणि एक षटकार ठोकला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. आता तो शतकाकडे आगेकूच करत आहे. सचिन तेंडुलकरनेही रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना १९८८ मध्ये पदार्पणातच शकत ठोकले होते. आता या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी अर्जुन तेंडुलकरकडे आहे. दरम्यान, गोव्याने आतापर्यंत ५ बाद ३२५ धावांपर्यंत मजल मारली आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याच्या संघाने ५ बाद २१० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर अर्जुन तेंडुलकरने सुयश प्रभूदेसाईसोबत जबरदस्त भागीदारी केली. यादरम्यान सुयश प्रभूदेसाईने आपलं शतक पूर्ण केले. तर अर्जुन तेंडुलकरनेही आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकाच्या दिशेने कूच केली. अखेर षटकार ठोकत अर्धशतकाला गवसणी घातली.
अर्जुन तेंडुलकर टी-२० लीगमध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. सचिन तेंडुलकरनेही प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करताना डिसेंबर १९९८ मध्ये गुजरातविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकले होते. वयाच्या केवळ १५ व्या वर्षी अर्जुन तेंडुलकरने ही कामगिरी केली होती. सचिनने १२ चौकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली होती.