MI vs PBKS । मुंबई : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईच्या संघावर विविध स्तरातून टीका होत आहे. अशातच भारताच्या माजी खेळाडूने मुंबईच्या कालच्या पराभवाला अर्जुन तेंडुलकर जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आकाश चोप्राच्या (aakash chopra) म्हणण्यानुसार, अर्जुन तेंडुलकरच्या ३१ धावांच्या एका षटकामुळे सामन्याचा निकाल बदलला आणि मुंबईचा संघ सामन्यात मागे पडला.
दरम्यान, १५ षटकांपर्यंत पंजाब किंग्जच्या संघाने ४ बाद ११८ धावा केल्या होत्या. यानंतर अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीला आला आणि त्याने आपल्या एकाच षटकात ३१ धावा दिल्या. यानंतर पंजाब किंग्जच्या फलंदाजांना गती मिळाली आणि त्यांनी २० षटकांत २१४ धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत पंजाबने जवळपास १०० धावा केल्या आणि अखेरीस या धावा मुंबई इंडियन्सला महागात पडल्या.
अर्जुनचे षटक मुंबईला महागात पडले - चोप्रा आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, अर्जुन तेंडुलकरच्या त्या एका षटकामुळे संपूर्ण सामना पंजाबकडे वळला. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, "पहिल्या १० षटकात पंजाबच्या ८५ धावाही झाल्या नव्हत्या. यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता की, पंजाबचा संघ १६० धावा करू शकेल की नाही पण त्यांनी २१४ धावा केल्या. अर्जुन तेंडुलकरने त्या षटकात ३१ धावा दिल्या आणि तिथूनच सामना बदलत गेला."
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात केवळ २०१ धावाच करू शकला. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"