नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत आहे. तसेच, पुढील देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये तो गोवा संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्समध्ये सहभाग होता. त्याने 2020-21 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरयाणा आणि पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी दोन सामने खेळले होते.
अर्जुन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, "करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या संघाकडून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच, तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा एक नवीन टप्पा सुरू करत आहे.
अर्जुन तेंडुलकरने तीन सीजनपूर्वी भारताच्या अंडर-19 संघाकडून श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी मुंबईच्या मर्यादित षटकांच्या संभाव्य संघातही त्याचा समावेश होता. अर्जुनसाठी सर्वात मोठी निराशा म्हणजे, या सीजनमध्ये त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई संघातून वगळण्यात आले. दरम्यान, गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जुन तेंडुलकरचा राज्यातील संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
याचबरोबर, गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोतलीकर यांनी पीटीआयला सांगितले की, आम्ही डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. त्यामुळे आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. सीजनपूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळणार आहोत. या सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकर खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेतील.