महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) यानं शुक्रवारी मुंबईच्या सीनिअर संघाकडून पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक आली ट्रॉफीसाठी ( Syed Mushtaq Ali Trophy) मुंबई संघनिवडीसाठीच्या सराव सामन्यांत अर्जुनला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. टीम डी चे प्रतिनिधित्व करताना अर्जुनला चार सामन्यांत चार विकेट्स घेतल्या होत्या आणि फलंदाजीतही निराशाजनक कामगिरी करताना ७ धावा केल्या होत्या. तरीही कोरोना व्हायरसमुळे संघातील खेळाडूंची संख्या २२ करण्यात आल्यामुळे त्याची निवड केली गेली. आज त्याला हरयाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईनं अंतिम ११मध्ये स्थान दिले.
२१ वर्षीय अर्जुन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात अंतिम ११मध्ये नव्हता. पण, आज सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली त्यानं पदार्पण केलं. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू अर्जुनकडे टीम इंडियाच्या नेटमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. तो मुंबई इंडियन्ससोबत यूएईलाही गेला होता. सीनिअर संघातील त्याचे हे पदार्पण फार चांगले राहिले नाही. त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. मुंबईला १९.३ षटकांत सर्वबाद १४३ धावा करता आल्या.
सचिन तेंडुलकरनं मुंबईसाठी अखेरचा सामना हरयाणाविरुद्ध खेळला होता आणि आज अर्जुननं हरयाणाविरुद्ध मुंबईच्या सीनिअर संघाकडून पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या षटकात 15 धावा चोपल्या, परंतु दुसऱ्याच षटकात त्यानं हरयाणाच्या सी के बिश्नोईला बाद केलं.