IPL 2022 Auction मध्ये मुंबई इंडियन्सने येत्या स्पर्धेसाठी दमदार खेळाडूंची निवड केली. या संघात एक नाव अपेक्षित होतंच ते म्हणजे Arjun Tendulkar. अर्जुनचं नाव येताच मुंबईने बोली लावली. आश्चर्य म्हणजे गुजरातनेही त्याच्यावर बोली लावली. पण अखेर मुंबई इंडियन्सनेच मूळ किमतीवर १० लाख जास्त देत ३० लाखांना अर्जुनला आपल्या संघात स्थान दिले. अनपेक्षित बोली आणि अपेक्षित खरेदीनंतर अर्जुन तेंडुलकरने एक व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अर्जुन तेंडुलकरने गेल्या वर्षीदेखील IPL च्या लिलावात नाव नोंदणी केली होती. त्यावेळी मुंबईच्या संघाने त्याला मूळ २० लाखांच्या किमतीत विकत घेतलं होतं. या वेळेसही तो मूळ किमतीत विकत घेतला जाईल असं वाटत असताना गुजरातने बोली लावत त्याचा भाव वाढवला. त्यामुळे अर्जुनला संघात घेण्यासाठी मुंबईला बोली वाढवावी लागली. मुंबईने त्याला खरेदी केल्यावर त्याने व्हिडीओच्या मार्फत प्रतिक्रिया दिली. "मुंबई इंडियन्स संघाने मला पुन्हा विकत घेतल्याचा मला आनंद आहे. २००८ पासून मी या संघाचा खूप मोठा चाहता आहे. संघाचे मालक आणि सपोर्ट स्टाफ यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार. मी संघासाठी सर्वस्व पणाला लावेन", अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
दरम्यान, मुंबईच्या संघासोबत अर्जुन तेंडुलकर IPL 2020 मध्येही होता. IPLचा पहिला टप्पा भारतात खेळण्यात आला. त्यावेळी त्याला संधी मिळाली नाही. कोरोनाच्या तडाख्यानंतर दुबईत दुसऱ्या टप्प्यासाठी तो संघासोबत गेला. पण सराव करताना झालेल्या दुखापतीमुळे तो सामना न खेळताच भारतात परतला. त्यामुळे यंदाच्या IPL मध्ये त्याला अंतिम संघात संधी मिळते का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.