मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने स्थानिक क्रिकेट सामन्यात पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाज चाचपडताना दिसले. कुच बिहार चषक स्पर्धेतील सामना नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला स्टेडियमवर सुरू आहे. त्यात अर्जुनने मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. मुंबईच्या पहिल्या डावातील 453 धावांच्या उत्तरात दिल्लीचा संघ 396 धावांवर माघारी परतला. मुंबईने दुसऱ्या डावात 2 बाद 60 धावा केल्या आहेत.
मुंबईच्या पहिल्या डावांचा पाठलाग करताना गगन वॅट्स ( 100) आणि प्रियांश आर्या ( 152) यांनी दमदार खेळी करत दिल्लीला आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली. मात्र, ही दोघं माघारी परतल्यानंतर अर्जुनच्या गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. अर्जुनने दिल्लीचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्याने कर्णधार आयुष बदोनी, वैभव कंडपाल, गुरझार सिंग संधू, हृतिक शोकेन आणि प्रशांत भाटी यांना बाद केले. अर्जुनने 29 षटकांत 4 निर्धाव षटकांसह 98 धावा देताना 5 बळी टिपले.