मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने वडिलांप्रमाणेच क्रिकेटला आपंल सर्व काही मानलं असून यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. नुकतंच अर्जुन तेंडुलकरने आगामी टी-20 मुंबई लीगसाठी आपलं नाव नोंदवलं होतं. अर्जुन तेंडुलकर टी 20 - मुंबई लीगमध्ये सहभागी होणार असल्याने सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनने या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं आहे. आपण अद्याप लीगमध्ये खेळण्यासाठी पुर्णपणे तयार नसल्याचं अर्जुनने सांगितलं आहे. 11 मार्च ते 21 मार्चदरम्यान ही टी-20 मुंबई लीग खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर लीगचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. अर्जुनने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय आपल्या वडिलांसोबत चर्चा केल्यानंतरच घेतलेला आहे.
याआधी जेव्हा अर्जुन तेंडुलकरने टी-20 मुंबई लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. अर्जुनने अचानक हा निर्णय कसा काय घेतला याचीही चर्चा सुरु होती. अर्जुन तेंडुलकरने नाव मागे घेतले असल्या कारणाने आयोजकांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. कारण मुंबईचे अनेक टॉप खेळाडू आधीच व्यस्त आहेत. काही खेळाडू श्रीलंकेत होणा-या तिरंगी मालिकेची तयारी करत आहेत, तर काही नागपूरमध्ये होणा-या इराणी ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहेत.
सचिन तेंडुलकरच्या एका सहका-याने अर्जुनच्या ट्रेनिंगसंबंधी बोलताना सांगितलं की, त्याचे प्रशिक्षक बॉलिंग अॅक्शनसहित प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहेत. त्यांनी सांगितलं की, 'अर्जुन चांगली प्रगती करत असून चांगल्या गतीने पुढे जात आहे. पण त्याचं गेलं एक वर्ष दुखापतीमुळे वाया गेलं'.
येत्या मार्च महिन्यात (11 ते 28 मार्च) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-20 मुंबई लीगचा थरार रंगणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, प्रोबॅबिलिटी स्पोर्ट्स आणि विझक्राफ्ट यांनी एकत्र येऊन ही लीग सुरू केलीय आणि सचिन तेंडुलकर त्याचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या स्पर्धेत मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे सहा संघ तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी 1500 क्रिकेटपटूंनी नावं नोंदवली आहेत. त्यातून सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली जाणार आहे. एकेकाळी 'क्रिकेटची पंढरी' मानल्या जाणाऱ्या मुंबईला गतवैभव पुन्हा मिळावं, हा या लीगच्या आयोजनामागचा हेतू आहे.
'खेळात करिअर करा, नवनव्या संधी निर्माण होताहेत'; सचिन तेंडुलकरचा सल्लागेल्या काही वर्षांत सुरू झालेल्या लीग स्पर्धा या क्रीडा क्षेत्रासाठी खूपच फायद्याच्या आहेत. त्यामुळे मुलांनी फक्त क्रिकेटच असं नव्हे, तर कुठल्याही खेळाकडे करिअर म्हणून पाहायला हवं, असा सल्ला भारताचा विक्रमादित्य क्रिकेटवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलाय. काही वर्षांपूर्वी पुरेशा संधी नसल्याने अनेक गुणवंत क्रीडापटू पुढे येऊ शकले नाहीत. देशासाठी खेळण्याची क्षमता असूनही त्यांना तिथवर पोहोचता आलं नाही. पण, आज क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस लीग आहेत आणि या स्पर्धांमध्ये खेळून, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुणीही खेळाडू आपल्या कुटुंबाचा आधार होऊ शकतो, ही खूप सकारात्मक गोष्ट असल्याचं सचिननं नमूद केलं.