Join us  

"तू संघाचा नवीन यॉर्कर किंग...", अर्जुन तेंडुलकर अन् मुंबईच्या शिलेदारांचा संवाद Viral

IPL 2023, MI vs SRH : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 2:34 PM

Open in App

arjun tendulkar । मुंबई : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. मुंबई इंडियन्सने (MI vs SRH) मंगळवारी यजमान सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून विजयाची हॅटट्रिक लगावली. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरसाठी तो दिवस खूप खास होता. कारण मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने या सामन्यातून आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतली. ३ वर्षे मुंबईच्या संघासोबत राहिल्यानंतर अखेर रविवारी अर्जुनने केकेआरविरूद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमधील दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करून ज्युनिअर तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले.

दरम्यान, साखळी फेरीतील आपला सहावा सामना खेळण्यासाठी मुंबईचा संघ हैदराबादहून मुंबईला रवाना झाला आहे. उद्या मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज असा सामना होणार आहे. यादरम्यान संघाचा आघाडीचा फलंदाज तिलक वर्माने ज्युनिअर तेंडुलकरशी खास संवाद साधला, ज्याचा व्हिडीओ फ्रँचायझीने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेव्हिस विमानात बसलेले पाहायला मिळत आहेत. 

मुंबईच्या शिलेदारांचा संवाद व्हायरल व्हिडीओच्या सुरूवातीला सर्वप्रथम तिलक अर्जुनला प्रश्न विचारताना म्हणतो, "आयपीएलमध्ये पदार्पणानंतर विकेट घेतल्यानंतर कसे वाटत आहे?, यावर अर्जुन म्हणतो, "साहजिकच खूप चांगले वाटत आहे". पुन्हा तिलक म्हणतो, "तू संघाचा नवीन यॉर्कर किंग झाला आहेस. अखेरच्या षटकात काय दबाव होता कारण तुला २० धावांचा बचाव करायचा होता?". याचे उत्तर देताना अर्जुनने म्हटले, "जास्त दबाव नव्हता. मी यासाठी खूप सराव केला होता आणि मला स्वत:वर विश्वास होता." 

यानंतर तिलकने अर्जुनला विचारले, "जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्या घरी जेवायला आलात तेव्हा जेवण कसे होते?" याच्या उत्तरात अर्जुन म्हणतो, "जेवण अप्रतिम होते. मी खाण्याचा शौकिन आहे, मला बिर्याणी, चिकन आणि मटण खायला आवडते. अप्रतिम जेवणासाठी तुझे वडील, प्रशिक्षक आणि सर्वांचे खूप खूप आभार." 

मुंबईच्या विजयाची हॅटट्रिक राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात रोहितसेनेने यजमानांना पराभवाची धूळ चारली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९२ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन (६४) आणि इशान किशन (३८) यांनी स्फोटक खेळी करून हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. १९३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला हॅरी ब्रुकच्या (९) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर मयंक अग्रवालने (४८) डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला रिले मेरेडिथने तंबूत पाठवले. अखेरच्या काही षटकांमध्ये हेनरिक क्लासेनने (३६) स्फोटक खेळी केली पण फिरकीपटू पियुष चावलाने त्याला आपल्या जाळ्यात फसवले. अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारचा बळी घेऊन मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. हैदराबादचा संघ १९.५ षटकांत सर्वबाद केवळ १७८ धावा करू शकला. मुंबईच्या संघाने १४ धावांनी विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक लगावली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३अर्जुन तेंडुलकरइशान किशनमुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकर
Open in App