Arjun Tendulkar Comeback, Ranji Trophy 2025 : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुन्हा खेळताना दिसू शकतो. रणजी ट्रॉफी मध्ये गोवा संघाचा पुढील सामना नागालँडशी होणार आहे. या सामन्यात अर्जुन गोवा संघाकडून खेळताना दिसू शकतो. विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अर्जुनला संघाबाहेर बसविण्यात आले होते. रणजी ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन गोवा संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम गोलंदाज असूनही त्याला बाहेर ठेवण्यात आले होते. अर्जुनने चार सामन्यात १६ बळी घेतले आहेत. गोवा आणि नागालँड यांच्यातील सामना २३ ते २७ जानेवारी दरम्यान दिमापुर येथे होणार आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.
२०२२-२३ च्या हंगामा आधी अर्जुन तेंडुलकर गोवा संघात सामील झाला. गोवा संघात जाण्याआधी त्याच्याकडे टी२० खेळाडू म्हणून अनुभव होता. अर्जुनने राजस्थान संघाविरुद्ध आपल्या रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार शतक लगावले होते. अर्जुनने आतापर्यंत २४ टी२० सामने, १८ अ-श्रेणी सामने आणि १७ फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण ३७ बळी घेतले आहे. तर पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या जास्त दिवसांच्या सामन्यात त्याचे ५२ बळी आहेत.
रोहितही रणजी खेळणार, १७ वर्षांनी योगायोग जुळून येणार
मुंबई विरूद्ध जम्मू काश्मीर यांच्यातील लढतीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने संघाची घोषणा केली असून यात रोहित शर्मासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड झालेल्या श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वालचीही निवड करण्यात आली आहे. रोहित रणजी खेळणार असल्याने तब्बल १७ वर्षांनी एक योगायोग जुळून येणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळणार हे जवळपास निश्चितच आहे. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार असताना रणजी स्पर्धा खेळण्याचा योग तब्बल १७ वर्षांनी जुळून येणार आहे. याआधी अनिल कुंबळेच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. २००७ साली कुंबळे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होता. त्याचवेळी त्याने हिमाचल प्रदेश संघाकडून रणजी क्रिकेट खेळले. त्यावेळी राहुल द्रविडनेही रणजी क्रिकेट खेळले होते.