नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हटला जाणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. अलीकडेच अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडून गोव्यात आला आहे आणि सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये गोव्याकडून खेळताना दिसत आहे. खरं तर तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा आहे, मात्र अद्याप त्याने पदार्पण केले नाही. गोवा विरुद्ध मणिपूर सामन्यात अर्जुन तेंडुलकरने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केले आहे.
अर्जुन तेंडुलकरने मणिपूरविरूद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने त्याच्या 4 षटकांत केवळ 20 धावा देऊन 2 बळी पटकावले. अर्जुन तेंडुलकरने कर्णजित युमनम आणि प्रफुल्लोमणी सिंग यांना तंबूत पाठवले. तसेच अर्जुन तेंडुलकरच्या चेंडूवर धावा काढण्यात कोणत्याच फलंदाजाला यश आले नाही.
अर्जुन तेंडुलकरची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील कामगिरी पाहिल्यानंतर चाहते भारतीय संघामध्ये त्याची निवड करण्याची मागणी करत आहेत. एका युजरने लिहिले की, "अर्जुन तेंडुलकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, ते पाहता तो भारतीय संघात येऊ शकतो." आणखी एका युजरने लिहिले की, "अर्जुन तेंडुलकरला भारतीय संघात संधी देण्याची वेळ आली आहे."