Join us

Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय

Arjun Tendulkar Video: अर्जुनने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 17:53 IST

Open in App

Arjun Tendulkar Video: सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी अर्जुन तेंडुलकरने आपल्या तुफानी गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या अर्जुन कर्नाटकात सुरू असलेल्या डॉक्टर के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत खेळत आहे. तिथे त्याने गोव्याकडून खेळताना KSCA XI विरुद्ध धमाका केला. अर्जुनने शानदार गोलंदाजी करत गोव्याला एक डाव आणि १८९ धावांनी विजय मिळवून दिला. अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात एकूण ९ विकेट्स घेतल्या. त्यात पहिल्या डावात त्याने पाच तर दुसऱ्या डावात चार बळी टिपले.

अर्जुनची धारदार गोलंदाजी

अर्जुन तेंडुलकरने KSCA XI विरूद्ध पहिल्या डावात केवळ ४१ धावांत ५ बळी घेतले. पहिल्या पाचपैकी चार फलंदाजांना अर्जुनने बाद केले आणि त्यानंतर अक्षन रावची विकेट घेत पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे KSCA XI ला पहिल्या डावात केवळ १०३ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गोवा क्रिकेट असोसिएशन संघाने पहिल्या डावात ४१३ धावांची मोठी मजल मारली. अभिनव तेजरानाने १०९ धावांची खेळी केली. तर मंथन खुटकरने ६९ धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावातही अर्जुनची चमक

अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या डावातही गोलंदाजीत पराक्रम केला. KSCA XI चा संघ १२१ धावांतच गारद झाला. यावेळी अर्जुनने दमदार गोलंदाजी केली. अर्जुनने दुसऱ्या डावात ५५ धावांत ४ बळी घेतले. अशाप्रकारे अर्जुनने एकूण ९ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरगोवा