Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या IPL मधील असा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही विजय मिळवलेला नाही. IPL 2022 सीझनमध्ये मुंबईची सर्वात वाईट कामगिरी सुरू आहे. गेली सात-आठ वर्षे मुंबईच्या संघाची घडी बसली होती. पण क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, लसिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट अशी काही मोठं नावं मुंबईच्या संघातून बाहेर गेली. त्यामुळे नव्या खेळाडूंची एकत्रित मोट बांधण्याचा प्रय़त्न मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहे. मुंबईच्या संघाकडून तिलक वर्मा, ऋतिक शोकीन यांसारख्या नवख्या खेळाडूंना सातत्याने संधी दिली जात आहे. परंतु, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबईचा संघ कधी संधी देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्सने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो सराव करताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीच्या व्हिडीओवर कॅप्शन लिहिले आहे की, अर्जुन, लय भारी! तुझी गोलंदाजी अँक्शन आणि फॉलो थ्रू एकदम परफेक्ट आहे. सात सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अर्जुन रनअपसह गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, यावेळी कोचिंग स्टाफही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत अर्जुन पुढच्या सामन्यातून तरी आयपीएलमध्ये पदार्पण करणार का? असा सवाल मुंबईच्या चाहत्यांकडून केला जातोय.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेला आहे. सुरूवातीचे आठच्या आठ सामने मुंबई पराभूत झालंय. संघाला प्ले ऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर किमान १४ गुण होणे गरजेचं आहे. पण मुंबई इंडियन्सचे मात्र आता सहाच सामने शिल्लक आहेत. ते सर्व सामने जिंकले तरीही त्यांना १२ गुणांपर्यंतच पोहोचता येईल. त्यामुळे मुंबईला आता संघात इतर नव्या खेळाडूंना संधी देऊन पुढील दोन वर्षांच्या संघबांधणीचा विचार करता येऊ शकेल.
Web Title: Arjun Tendulkar Video posted by Mumbai Indians Bowling with pace and excellent follow through IPL 2022 Debut Chance Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.