Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK Video: मुंबई इंडियन्सला गुरूवारी चेन्नई सुपर किंग्जसमोर पराभूत व्हावे लागले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने योग्य वेळी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने नाबाद २८ धावांची खेळी केली. मुंबईचा स्पर्धा सुरू झाल्यापासून हा सलग सातवा पराभव ठरला. या पराभवासोबत मुंबईच्या प्ले-ऑफ्सच्या आशा जवळजवळ मावळल्या आहेत. या सामन्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने जे सराव सत्रात (नेट प्रॅक्टिसमध्ये) केलं, तेच मुंबई इंडियन्ससोबत मुख्य सामन्यात घडलं आणि सामन्याच्या सुरूवातीलाच मुंबईला जबर धक्का बसला.
नक्की काय घडलं?
मुंबई इंडियन्सने सामन्याआधी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अर्जुन तेंडुलकरचं कौतुक करण्यात आलं होतं. कारण, अतिशय भेदक अशा यॉर्करवर त्याने मुंबईचा लिलावातील सर्वात महागडा फलंदाज इशान किशनचा त्रिफळा उडवला होता. या सराव सत्राच्या चुकीतून इशान काहीच शिकला नाही. त्यामुळेच सामना सुरू झाल्यावर पहिल्याच षटकात डावखुऱ्या मुकेशने आऊटस्विंग करत यॉर्कर टाकला, त्यावेळी तो तशाच पद्धतीने क्लीन बोल्ड झाला.
अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा व्हिडीओ-
इशान किशनची सामन्यातील विकेट-
दरम्यान, मुंबईच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. रोहित शर्मा (०), इशान किशन (०), डेवाल्ड ब्रेविस (४) झटपट झाले. सुर्यकुमारला सुरुवात चांगली मिळाली होती, पण तो ३२ धावा काढून माघारी परतला. नवख्या ऋतिक शोकीनने २५ चेंडूत २५ धावा केल्या. तर किरॉन पोलार्ड १४ धावांवर बाद झाला. तिलक वर्माने मात्र नाबाद राहत ४३ चेंडूत ५१ धावांची उपयुक्त खेळी केली. पण अखेरीस मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.