मुंबई - क्रिकेटच्या मैदानावर आपल्या चांगल्या प्रदर्शनामुळे नेहमी चर्चेत असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. कूच बिहार ट्रॉफीत पाच विकेट्स मिळवणा-या अर्जुन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 18 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात स्प्रिट ऑफ ग्लोबल चॅलेंजमध्ये सहभागी होत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी जबरदस्त खेळी केली. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात अर्जुनने भारतीय संघातील क्रिकेटर्सच्या क्लबकडून खेळताना 27 चेंडूत 48 धावा ठोकल्या. इतकंच नाही तर जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हाही त्याने कमाल करत हाँगकाँग संघाचे चार फलंदाज तंबूत परतवले.
आपल्या जबरदस्त खेळीवर बोलताना अर्जुनने पहिल्यांदाचा आपल्या आवडत्या खेळाडूंची नावे सांगितली. विशेष म्हणजे यामध्ये त्याचे वडील सचिन तेंडुलकरचं नाव नव्हतं. अर्जुनने सांगितलं की, आपल्याला लहानपणापासूनच जलद गोलंदाजी करायला आवडते. जेव्हा त्याला त्याच्या रोल मॉडेलबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने मिचेल स्टार्क आणि ब्रेन स्टोक्सचं नाव घेतलं.
'मी कोणत्याही प्रकारचं दडपण घेत नाही. जेव्हा प्रश्न गोलंदाजीचा येतो तेव्हा मी प्रत्येक चेंडूत आपलं सर्वस्व पणाला लावतो. आणि जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा कोणत्या चेंडूवर शॉट मारायचा आहे आणि कोणत्यावर सांभाळून खेळायचं आहे याकडे लक्ष देतो', असं अर्जुन तेंडुलकर बोलला आहे.
पुढे बोलताना अर्जुनने सांगितलं की, 'मला लहानपणापासूनच जलद गोलंदाजी करायला आवडतं. आपल्या भारतीय संघात जलद गोलंदाजांची नेहमीच कमतरता राहिली आहे. जसंजसा मी मोठा होता आहे मी अजून मजबूत होत असल्याचं मला जाणवत आहे. एक उत्तम जलद गोलंदाज म्हणून मला माझी ओळख निर्माण करायची आहे'.