कोलंबो - महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने पहिली विकेट घेतली. कोलंबो येथे सुरू झालेल्या 19 वर्षांखालील श्रीलंका संघाविरूद्धच्या पहिल्या युवा कसोटी सामन्यात 12 चेंडूंत अर्जुनने पहिला बळी टिपला. त्याने दुस-या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर कामिल मिश्राला पायचित केले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार अनुज रावतने पहिले षटक टाकण्यासाठी चेंडू अर्जुनच्या हाती दिला. कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना अर्जुनने दुस-याच षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. 15 वर्षीय अर्जुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना आक्रमक फलंदाजी करणा-या मिश्राला बाद केले. त्याने 11 चेंडूंत दोन चौकार लगावताना 9 धावा केल्या होत्या.