कोलंबो :
माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी आयपीएल खेळत असलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना लीग सोडून संकटात सापडलेल्या देशातील नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.
अनेक दिवसांपासून श्रीलंका आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. इंधन, धान्य व दैनंदिन वापरातील वस्तू महागल्या आहेत. महागाईविरोधात श्रीलंकेचे नागरिक रस्त्यावर उतरले असून श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. रणतुंगा यांनी आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या लंकेच्या खेळाडूंना लक्ष्य केले. खेळाडूंनी आयपीएल सोडून श्रीलंकेमधील निदर्शनांत सहभागी व्हावे असे आवाहन रणतुंगा यांनी केले.
‘श्रीलंकेचे काही क्रिकेटपटू भारतात आयपीएल खेळत आहेत. येथे नागरिक सरकारच्या विरोधात बोलायला घाबरत आहेत. मात्र क्रिकेटपटूसुद्धा त्यांची नोकरी शाबूत ठेवण्यासाठी बोलत नाहीत. काही क्रिकेटर समोर येऊन भूमिका मांडत असल्याने आयपीएल खेळणाऱ्या लंकेच्या खेळाडूंनी पुढे येण्याची गरज आहे. त्यांनी एका आठवड्यासाठी आयपीएल सोडून श्रीलंकेतील निदर्शनाला पाठिंबा द्यायला हवा,’ असे रणतुंगा म्हणाले.
माजी कर्णधार कुमार संगकारा, माहेला जयवर्धने तसेच वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हे माजी खेळाडू, तर वनिंदू हसरंगा, भानुका राजपक्षे, दुशमंथा छमीरा, छमिका करुणारत्ने व महीश तीक्ष्णा हे वेगवेगळ्या संघांमध्ये सहभागी आहेत.