Sri Lanka Sports Ministry, Arjuna Ranatunga : वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारताकडून दारूण पराभव झाल्यानंतर क्रिकेट बोर्डाविरोधात श्रीलंकेत आंदोलन पेटले. विविध ठिकाणी निदर्शने अन् बोर्ड बरखास्त करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले. अशातच श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त होण्यास जय शहा जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.
रणतुंगा यांनी आरोप करताना म्हटले की, जय शहा हेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत असून बोर्ड उद्ध्वस्त होण्यामागे त्यांचाच हात आहे. खरं तर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला आयसीसीने बरखास्त केले आहे. राजकीय हस्तक्षेप असल्याचे कारण देत आयसीसीने ही कारवाई केली. तसेच बोर्डाचे सदस्यत्व देखील काढून घेण्यात आले आहे.
जय शहांवर गंभीर आरोप
आयसीसीच्या निर्णयानंतर अर्जुन रणतुंगा यांनी 'डेली मिरर'शी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "श्रीलंका क्रिकेट बोर्डातील अधिकारी आणि जय शहा यांच्यातील संबंधांमुळे बीसीसीआयचे आमच्या बोर्डावर नियंत्रण होते. जय शहा हेच श्रीलंका बोर्ड चालवायचे. त्यांच्या दबावामुळेच बोर्ड उद्ध्वस्त झाले. भारताचा एक माणूस श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला सुरूंग लावत आहे", अशा शब्दांत रणतुंगा यांनी शहांवर टीकेचे बाण सोडले. तसेच जय शहा हे केवळ त्यांच्या वडिलांमुळेच शक्तीशाली आहेत. कारण त्यांचे वडील अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत, असेही रणतुंगा यांनी नमूद केले.
श्रीलंकेची निराशाजनक कामगिरी
२०२३च्या विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. आठपैकी सहा सामने गमावल्याने श्रीलंकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला. गुणतालिकेत तो नवव्या स्थानावर आहे. श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेने १०२ धावांनी, पाकिस्तानने ६ गडी राखून, ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून, अफगाणिस्तानने ७ गडी राखून, भारताने ३०२ धावांनी आणि बांगलादेशने ७ गडी राखून पराभूत केले.
Web Title: Arjuna Ranatunga said, bcci secretary Jay Shah is running Sri Lanka Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.