विजयनगरम : बलाढ्य मुंबईने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या आपल्या सलामी लढतीत वर्चस्व मिळवताना आंध्र प्रदेशविरुद्ध ५२ धावांची आघाडी मिळवली. अरमान जाफरने २६७ चेंडूंत १६ चौकार व एका षटकारासह नाबाद ११६ धावांची खेळी केली. आंध्र प्रदेशला पहिल्या दिवशी २३८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर १०३ षटकांत ६ बाद २९० धावा केल्या.
बुधवारी १ बाद २५ धावांवरून सुरुवात केलेल्या मुंबईकडून अरमान आणि यशस्वी जैस्वाल (४५) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी केली. शोएब खानने जैस्वालला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने (४४) अरमानला साथ देत त्याच्यासोबत तिसऱ्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. अजिंक्य पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
केव्ही शशिकांतने रहाणेला बाद केल्यानंतर मुंबईने ६३ धावांत ४ बळी गमावले. यामुळे मुंबईची २ बाद १६२ धावांवरून ६ बाद २२५ धावा अशी अवस्था झाली. एका बाजूने टिकून राहिलेल्या अरमानने मुंबईची पडझड रोखली. त्याने तनुष कोटियनसह दिवसभर नाबाद राहताना सातव्या गड्यासाठी नाबाद ६५ धावांची भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा कोटियन ५८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ४३ धावा काढून खेळत होता. शशिकांतने ३, तर शोएबने २ बळी घेतले.
धावफलकआंध्र प्रदेश (पहिला डाव) : ७४.४ षटकांत सर्वबाद २३८ धावा.मुंबई (पहिला डाव) : १०३ षटकांत ६ बाद २९० धावा (अरमान जाफर खेळत आहे ११६, तनुष कोटियन खेळत आहे ४३, अजिंक्य रहाणे ४४, यशस्वी जैस्वाल ४५, केव्ही शशिकांत ३/५०, शोएब खान २/७०.)