Join us  

सेनेच्या पार्श्वभूमीमुळे जुरेल बनला निर्भीड : रैना

ध्रुवने येथे पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावांचे योगदान दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 5:35 AM

Open in App

रांची : युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याने आंतरराष्ट्रीय पातळी गाठण्यासाठी कठोर मेहनत घेतली. त्याचे वडील सेनेत होते. त्यामुळे अखेरपर्यंत हार न मानण्याची वृत्ती हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य. तो फारच निर्भीडपणे खेळतो. त्याच्या यष्टिरक्षणातील कौशल्यावर आपण फार प्रभावित झालो, असे मत माजी खेळाडू सुरेश रैना याने व्यक्त केले. 

ध्रुवने येथे पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावांचे योगदान दिले. ध्रुवच्या या चमकदार कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ म्हणूनही निवडण्यात आले. जुरेलच्या या खेळीचे महान सुनील गावसकर यांनीही कौतुक करीत त्याला, ‘पुढचा महेंद्रसिंग धोनी’ असे संबोधले. रैना म्हणाला, ‘जुरेश शानदार खेळाडू आहे. मी त्याच्यासोबत उत्तर प्रदेशसाठी काही सामने खेळलो.  रोहितने सरफराज आणि जुरेल यांना संधी दिली. 

पदार्पणात अर्धशतकी खेळी करणे सोपे नव्हते. वळण घेणाऱ्या खेळपट्टीवर ही खेळी विशेष मानायला हवी.  दोन्ही युवा खेळाडूंना संधी देणारा रोहित अभिनंदनास पात्र ठरतो.’

 ऋषभचे टेन्शन वाढलेकार अपघातानंतर ऋषभ पंत संघाबाहेर आहे. त्यामुळे भारताला एका चांगल्या यष्टिरक्षक- फलंदाजाचा शोध होता. ऋषभ पंतही पुनरागमन करण्याच्या तयारीत असला, तरी   पुनरागमनानंतर त्याचा फॉर्म कसा असेल, हे नंतरच कळेल. ईशान किशन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून विश्रांती घेतल्यापासून बाहेर आहे. केएस भरत अपयशी ठरताच ध्रुवला पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यानंतर ध्रुवने मैदान गाजविले. फलंदाजीसोबतच तो यष्टिरक्षणातही कमाल करीत आहे. पुढील काळातही त्याचे स्थान निश्चित मानले जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड