चेन्नई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी, या आशयाची याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विराट आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. ‘आॅनलाईन गॅम्बलिंग’ची (जुगाराची) जाहिरात हे दोघेही करत असून अशा प्रकारांमुळे जुगाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
चेन्नईस्थित एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहेत. विराट कोहली आॅनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. युवकांमध्ये या अॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या आॅनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अॅॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली. विराट कोहली आणि तमन्ना हे सेलिब्रिटी अशा अॅॅपची जाहिरात करून तरुणांची दिशाभूल करत आहेत.
याचिकाकर्त्याने या याचिकेत एका कर्जबाजारी तरुणाचा दाखला दिला आहे. एका तरुणाने या आॅनलाईन अॅॅपसाठी पैसे उसने घेतले होते. पण ते पैसे परत करू न शकल्याने त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)