Robin Uthappa Arrest Warrant: भारताचा माजी क्रिकेटपटू (Indian Cricketer) रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याच्यावर APAFO मध्ये फसवणुकीचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, उथप्पाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून २३ लाख रुपये कापले पण ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले नाहीत. या कारणास्तव ४ डिसेंबर रोजी त्याला अटक करण्याचे वॉरंट जारी करण्यात आले. ही संपूर्ण रक्कम भरण्यासाठी त्याला २७ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वेळेवर पैसे जमा केले नाहीत, तर मात्र त्याला तुरुंगात जावे लागू शकते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रॉबिन उथप्पा बेंगळुरूमध्ये कपड्यांची कंपनी चालवतो. सेंच्युरी लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तो संचालक आहे. पीएफ आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात २३,३६,६०२ रुपये जमा करायचे होते. पण पैसे कापूनही कंपनीने तसे केले नाही, त्यामुळे उथप्पा विरुद्ध पूर्व बेंगळुरूमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
प्रकरणात वेगळाच ट्विस्ट
रॉबिन उथप्पा गेल्या काही वर्षांपासून वॉरंटमध्ये दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या उथप्पा दुबईत आहे. पोलिसांनी पीएफ कार्यालयालाही याबाबत माहिती दिली असून आता ही बाब त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या तरी उथप्पा विरोधात कोणतीही अधिकृत एफआयआर किंवा तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्याला केवळ पीएफ कार्यालयातून अटक वॉरंटचे आदेश मिळाले आहेत.