जोहान्सबर्ग : वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी आणि तब्बल २०० चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २७.३ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आला. भारताने १६.४ षटकांत दोन बाद ११७ धावा करताना विजय साकारला. ३७ धावांत पाच गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी ११७ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या षटकात ऋतुराज गायकवाड (५) मल्डरच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७३ चेंडूंत ८८ धावांची भागीदारी करताना विजय आवाक्यात आणला. फेहलुकवायोने श्रेयसला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयसने ४५ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५२ धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शनने तिलक वर्माच्या (नाबाद १) साथीत भारताला विजयी केले. साई सुदर्शनने ४३ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.
त्याआधी, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची वाताहत झाली. त्यांच्याकडून टोनी दी झोरझी (२८) आणि अँडिले फेहलुकवायो (३३) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताच्या युवा संघातील अर्शदीप, आवेश आणि मुकेश कुमार यांनी प्रभावी गोलंदाजी केली. अर्शदीप आणि आवेश यांनी नऊ गडी बाद केले. अर्शदीपने ३७ धावांत पाच, तर आवेशने २७ धावांत चार गडी बाद केले, तर कुलदीप यादवने एक गडी बाद केला. रिझा हेन्ड्रिक्स (०), राॅसी वान डर दुसेन (०), एडन मार्करम (१२), हेन्री क्लासेन (६), डेव्हिड मिलर (२) हे फलंदाज भारताच्या वेगवान माऱ्यासमोर अपयशी ठरले. अर्शदीप आणि आवेश या दोघांनाही हॅटट्रिकची संधी होती. पण, दोघांनाही अपयश आले.
दक्षिण आफ्रिका : रिझा हेन्ड्रिक्स त्रि. गो. अर्शदीप सिंग ०, टोनी दी झोरझी झे. राहुल गो. अर्शदीप सिंग २८, राॅसी वान डर दुसेन पायचित गो. अर्शदीप सिंग ०, एडन मार्करम त्रि. गो. आवेश खान १२, हेन्री क्लासेन त्रि. गो. अर्शदीप सिंग ६, डेव्हिड मिलर झे. राहुल गो. आवेश खान २, वियान मल्डर पायचित गो. आवेश खान ०, अँडिले फेहलुकवायो पायचित गो. अर्शदीप सिंग ३३, केशव महाराज झे. गायकवाड गो. आवेश खान ४, नांद्रे बर्गर त्रि. गो. कुलदीप यादव ७, तरबेझ शास्मी नाबाद ११. अवांतर १३. एकूण २७.३ षटकांत सर्वबाद ११६ धावा. बाद क्रम : १-३, २-३, ३-४२, ४-५२, ५-५२, ६-५२, ७-५८, ८-७३, ९-१०१, १०-११६. गोलंदाजी : मुकेश कुमार ७-०-४६-०, अर्शदीप सिंग १०-०-३७-५, आवेश खान ८-३-२७-४, कुलदीप यादव २.३-०-३-१. भारत : ऋतुराज गायकवाड पायचित गो. मल्डर ५, साई सुदर्शन नाबाद ५५, श्रेयस अय्यर झे. मिलर गो. फेहलुकवायो ५२, तिलक वर्मा नाबाद १. अवांतर ४. एकूण : १६.४ षटकांत २ बाद ११७ धावा. बाद क्रम : १-२३, २-१११.गोलंदाजी : नांद्रे बर्गर ५.४-१-३५-०, वियान मल्डर ४-०-२६-१, केशव महाराज ३-०-१९-०, तारबेझ शम्सी ३-०-२२-०, अँडिले फेहलुकवायो १-०-१५-१.
भारत-दक्षिण आफ्रिका लढतीतील विक्रमदक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका वनडे सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतलेले सर्वाधिक बळी ९ जोहान्सबर्ग (२०२३) ८ मोहाली (१९९३) ८ सेंचुरियन (२०१३)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका वनडे सामन्यात ५ बळी घेणारे भारतीय गोलंदाज ५/६ -सुनील जोशी (नैरोबी-१९९९) ५/२२ -युझवेंद्र चहल (सेंचुरियन-२०१८) ५/३३ -रवींद्र जडेजा (कोलकाता-२०२३) ५/३७ -अर्शदीप सिंग (जोहान्सबर्ग-२०२३)वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ बळी घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत भारताने मिळवलेले विजय २६३ विरुद्ध श्रीलंका (कोलंबो-२०२३) २३१ विरुद्ध केनिया (ब्लोएमफोंटेन-२००१) २११ विरुद्ध वेस्टइंडीज (तिरुअनंतपुरम-२०१८) २०० विरुद्ध द.आफ्रिका (जोहान्सबर्ग २०२३)