मुंबई : ‘युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. या जोरावर तो लवकरच भारताच्या टी-२० संघात स्थान मिळवू शकतो,’ असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
२०१९ मध्ये आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून पदार्पण केल्यापासून अर्शदीप पंजाबचा महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. शास्त्री म्हणाले की, ‘अर्शदीपसारख्या युवा खेळाडूला दडपणाखाली सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहून चांगले वाटले. तो दबावाच्या क्षणीही शांतपणे खेळतो आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगली काम करतोय. त्यामुळे तो वेगाने प्रगती करत असल्याचे दिसून येते आणि लवकरच तो भारतीय संघात प्रवेश करेल.’
मलिकमुळे येते एडवर्ड्सची आठवण - लारा
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा यांनीही यंदा प्रभावित केले आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराने मलिकची तुलना विंडीजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्ससोबत केली. लारा म्हणाला की, ‘उमरान मलिकमुळे मला फिडेल एडवर्ड्सची आठवण येते. तो सुरुवातीला खूपच वेगाने मारा करायचा. माझ्या मते या जोरावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवू शकतो, याची त्याला जाणीव आहे. तो नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. आयपीएलमध्ये फलंदाजांना वेगवान मारा खेळण्याची सवय होते. त्यामुळे भविष्यात मलिक आपल्या गोलंदाजीत आणखी सुधारणा करेल.’